जळगाव । महानगरपालिकेत सामन्य नागरिकांचा सर्वांत जास्त संपर्क असणारा विभाग म्हणजे जन्म मृत्यू विभाग आहे. येथे नागरिकांचा रोजच राबत असतो. जन्म मृत्यू विभागात गेल्यावर विभागाच्या नोंदींमध्ये अपूर्ण माहिती असल्याने दाखला नागरिकांना खाली परतावे लागत आहे. विभागात डाटा संकलीत करतांना त्यात अपूर्ण माहीती भरण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु असून देखील प्रशासनातर्फे नोंदीच्या माहीतीचे अपडेशन होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अपूर्ण माहिती नोंद
महानगरपालिकेच्या जन्म मृ्त्यु विभागात तात्कालीन नगरापालिकेपासून या जन्म मृत्युच्या नोंदीचे रजिस्टर, फाईली व कागदपत्रे या विभागात उपलब्ध आहेत. यात 70 ते 80 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड काही रजिस्टर गहाळ झाले आहेत. यात जन्माच्या नोंदीचे सन 1969, 1977, 1979,1967, 1968,1959, 1961 तर मृत्यूचे सन 1956, 1953, 1954, 1952 या वर्षाचे रेकॉर्ड गहाळ झाले आहे. तर अनेक नोंदीची माहीती अपूर्ण आहे. वडीलांचे आडनाव नाही, काही ठिकाणी आईचेच नाव अशा अनेक नोंदी असल्याने दाखले देतांना मनस्ताप होत असतो. यामुळे वेळ लागत असल्याने नागरिक व कर्मचारी यांच्यात वाद नित्याचेच झाले आहेत. अपूर्ण माहीती असलेल्या नोंदी अपडेट करण्याची मागणी होत आहे.