काकामिगहारा (जपान) । भारतीय महिला हॉकी संघाने आपणही पुरुष संघापेक्षा कमी नाही हे शुक्रवारी दाखवून दिले. आशियाई चषक स्पर्धेतील आपली अपराजित वाटचाल कायम राखताना भारतीय महिलांनी यजमान जपानचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरताना भारताच्या पुरुष संघाला द.आफ्रिकेविरुद्ध सामना बरोबरीत सोडावा लागला होता. त्याउलट महिला संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी दावेदारी पक्की करताना आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहे. निर्णायक लढतीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. अन्य उपांत्य लढतीत चीने कोरियाचे आव्हान 3-2 असे परतवून लावले. उपांत्यपूर्व फेरीत हॅट्ट्रिक करणार्या गुरजीत कौरनेच संघाला अंतिम फेरीचा दरवाजा उघडून देताना मोलाची भूमिका बजावली. गुरजीतने सातव्या आणि नवव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी आणखी वाढवताना मनजीत कौरने नवव्या मिनिटालाच गोल केला. पण जपानी महिलांनी जोरदार पुनरागमन करत मध्यंतरापर्यंत ही पिछाडी 2-3 अशी कमी करत सामन्यातली रंगत वाढवली.जपानच्या शिहो त्सुजीने 17व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर युई इशीबाशीने 28 व्या मिनिटाला दुसरा गोल केला .भारताकडून चौथा आणि निर्णायक गोल लालरेमसियमने केला. तिचा हा स्पर्धेतील पहिला गोल होता.
केवळ एकदाच विजयी
भारताने चौथ्यांदा आशियाई चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. पण भारताला केवळ एकदाच या चषक नाव कोरता आले आहे. 2004 साली भारताने जपानचा 1-0 असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती. त्याआधी 1999 मध्ये अंतिम फेरीत भारताला दक्षिण कोरियाने 3-2 असे हरवले होते. त्यानंतर 2009 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी चीनने भारताचा 5-3 असा पराभव करत भारताकडून विजेतेपद हिसकावले होते. आता 6 नोव्हेंबर रोजी होणार्या चीन विरुद्धच्या अंतिम लढतीत त्या पराभवाचा हिशोब चुकता करायची संधी मिळाली आहे.
भारताची बाजू भक्कम
स्पर्धेत अपराजीत वाटचाल करणार्या भारतीय हॉकी महिलांनी साखळी लढतींमध्ये चीनला 4-1 अश्या फरकाने हरवले होते. त्यामुळे या विजयाची पुनरावृत्ती अंतिम सामन्यात करून आशियाई चषक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद मिळवून भारतीय महिला डबल धमाका करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या आशियाई चषक स्पर्धेतील अंतिम लढतीत पुरुष संघाने मलेशियाला 2-1 असे हरवत तिसर्यांदा विजेतेपद मिळवले होते. आशिया चषक स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ चीनला हरवून जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल.