शिंदखेडा। तालुक्यातील तावखेडा गावाच्या शिवारात असलेल्या शेतातील गोदामामध्ये असलेला अवैध वाळूसाठा व साहित्य छापा टाकून जप्त करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारूडे आणि त्यांच्या पथकाने हि कारवाई केली.
कारवाई 22 मे रोजी झाली असून गुन्हा मात्र 26 मे रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पथकाने कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले नाही. जप्त केलेले साहित्य घटन स्थळीच राहू दिले असल्याची चर्चा आहे. तसेच गुन्हा त्याच दिवशी न नोंदवता चार दिवस उशिराने नोंदविण्यात आल्याने कारवाई पथकाच्या या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने घटनास्थळी 10 लाख 77 हजार 500 रूपयांचे साहित्य जप्त केले. कारवाई केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महसूल प्रशासनाच्या कारभाराबाबत चर्चा
दि.22 मे रोजी सुकवद गावाचे तलाठी गुलाबराव पवार हे दुपारी बारा वाजेनंतर काम आटोपून जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरून सुकवदहून दभाषी गावाकडे जात असतांना तावखेडा शिवारातील शेतात मोठे गोडाऊन त्यांना दिसले. त्या ठिकाणी नेमके काय आहे? याची पाहणी करण्यासाठी तलाठी पवार गेले असता पांढ-या रंगाच्या सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळूसाठा केलेला आढळला. तलाठ्यांनी याबाबत चौकशी केली असता उप्परपिंड येथून वाळू गोडाऊन मध्ये आणली जाते. साफसफाई करून गोण्यांमध्ये भरून विक्री केली जात असल्याचे गोडाऊन मध्ये असलेल्या पंकज पाटील याने सांगितले. आवश्यक कागदपत्रांची मागणी तलाठ्यांनी केली असता संबंधितांना दाखवता आली नाही. यानंतर तहसिलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून अवैध वाळूसाठा व इतर साहित्य ताब्यात घेवून पंचनामा केला. जप्त केलेल्या सामग्रीत बाराशे वाळूने भरलेल्या गोण्या, दहा लाख रूपये किमतीचे जेसीबी मशीन, दहा हजार रूपये किमतीचे वाळू चाळणी मशिन, दहा हजार रूपये किमतीचे गोण्या शिवण्याचे मशिन, सात हजार पाचशे रूपये किमतीचा जप्त केला आहे. या बाबत निमेशभाई पटेल, पंकज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडाऊनवर छापा 22 मे रोजी टाकण्यात आला परंतु गुन्हा चार दिवस उशिराने म्हणजे 26 मे रोजी दाखल करण्यात आला असल्याने महसूल प्रशासनाच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.