जप्त केलेल्या 691 बेवारस गाड्यांचा लिलाव!

0

पुणे । महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत असलेल्या बेवारस गाड्या जप्तीची मोहीम महापालिकेच्या अतिक्रम विभागाने हाती घेतली होती. या कारवाईत 691 गाड्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उचलल्या असून त्यामध्ये दुचाकी गाड्या 368, तीन चाकी 66, चारचाकी 250, सहाचाकी सहा गाड्या आणि सहा चाकीपेक्षा जास्त एका गाडीचा समावेश आहे. या गाड्या सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या सोडवून घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यामुळे या गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
अतिक्रमण विभागाच्या वतीने प्रथमच अशी कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयुक्त कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी खास लिलावकर्ता नियुक्त करण्यात आला असून, येत्या आठवडाभरात लिलावासाठीची सर्व वाहने पाहण्यासाठी महापालिकेच्या विविध ठिकाणची गोदामे खुली केली जातील.

तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी व चारचाकी
शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहन मालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. ही वाहने स्क्रॅप करत नाही. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी कित्येक बेवारस वाहने रस्त्यावरती गेली अनेक वर्षे पडून आहेत. या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासन नेहमी सांगत असते परंतु ही उचललेली वाहने कुठे टाकायची ही प्रशासनापुढे मोठी समस्या आहे आणि ती पूर्ण पाने सोडवण्यास प्रशासनाला यश आले नाही. तसेच वाहने उचलताना त्यासाठी लागणारी क्रेन आदी यंत्रणा देखील महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

वाहने वाहतुकीसाठी अडथळा
त्यामुळे बर्‍याच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ही वाहने काढण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेकडे वारंवार करण्यात येते. याबाबत बरोबर पलिकेतर्फे ही वाहने उचलण्याची मोहीम हाती घेण्यात येत मात्र वाहने काही उचलली जात नाही. यावेळी देखील महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.