जप्त मिळकतींचा लिलाव स्थगित

0

जळगाव । महापालिकेच्या थकीत घरपट्टी न भरणार्‍या 325 मिळकतधारकांच्या मालमत्तांचा लिलाव आज मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होता. ही लिलाव प्रक्रीया महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या सभागृहात सुरू करण्यात आली होती. मात्र, मात्र, सभागृहातच काही जणांनी थकीत रक्कम दिली. इतरांनी मुदत देण्याची विनंती केली. त्यामुळे लिलाव स्थगित करुन 5 मार्चपर्यंत थकीत रक्कमा भरण्याची मुदत अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली. यामुळे सुमारे साडेचारशे थकबाकीदारांना दिलासा मिळाला आहे.

814 मालमत्तांना सिल
महापालिकेची असलेली कर्जाची परतफेड, कर्मचार्‍यांची देणी, मक्तेदारांची प्रलंबीत बिले असे आदी आर्थिक देणे होते. यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांकडून धडक मोहिम राबवित वसुली केली होती. यात थकबाकी असलेल्या 814 मालमत्तांना सिल लावत जप्ती करण्यात आली. जप्ती कारवाई नंतर मोठ्या प्रमाणात 489 मिळकतधारकांनी भरणा केला. उर्वरीत 325 जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रीया मंगळवारी करण्यात येणार होती. या नागरिकांकडे जवळपास 70 लाखांची थकबाकी आहे.

थकबाकी न भरल्यास लिलाव
यासाठी पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर अपर आयुक्त राजेश कानडे, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी, संजय नेमाडे, सुशील साळुंखे व संजय पाटील यांच्या उपस्थितीत 325 मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली. परंतु यावेळी थकबाकीदारांनी पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी, पैसे भरण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच सुमारे 40 जणांनी थकबाकीचे धनादेश तर पंधरा जणांनी रोख रक्कमेचा भरणा केला. यामुळे लिलाव 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला. या कालावधीत पैसे न भरल्यास 5 मार्चनंतर पुन्हा लिलाव करण्याचा इशाराही देण्यात आला. थकीत घरपट्टीधारकांच्या ज्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्या मालमत्तांच्या तुलनेत थकीत घरपट्टीच्या रक्कमा कमी असल्याने या मालमत्तांच्या लिलावासाठी अनेक जण उपस्थित राहीले होते.