जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपातून पतीची सुटका

0

इंदापूर । महिलेचा गर्भपात केला नसल्याचा जबाब पोलीस तपासादरम्यान धन्वंतरी पॉलीक्लिनिकचे डाक्टरांनी दिल्याने जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या श्रावणबाळ अनाथ आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष राजीव करडे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे फिर्याद दिलेल्या तक्रार प्रकरणाला अचानक कलाटणी मिळाली असून फिर्यादी असणार्‍या पत्नीच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.

जुलै, 2009मध्ये फिर्यादीचा राजीव करडे यांच्याशी हिंदू धर्माप्रमाणे विवाह झाला होता. सुरुवातीचे दोन महिने प्रपंच सुरळीत चालला. त्यानतर पती राजीवने मला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्रासाला व जाचाला कंटाळून फिर्यादीने सन 2012मध्ये पती राजीव विरुद्ध तक्रारदेखील केली होती. त्यानंतर 22 एप्रिल, 2013 रोजी समेट घडवून मी परत इंदापूरला पतीसोबत नांदण्यास आले. आमचा संसार सुखाने चालला होता. त्या दरम्यान मला दिवस गेले व मी गरोदर राहिले. परंतु नवर्‍याने मला गर्भपात कर नाहीतर मी आत्महत्या करेन असे म्हणून 12 ऑगस्ट, 2013 रोजी मुंबई येथील धन्वंतरी पॉलीक्लिनिकमध्ये नेऊन माझ्या मनाविरुद्ध गर्भपात केला. अशी फिर्याद पत्नीने पती, सासू व सासरा यांच्याविरुद्ध 10 जानेवारी, 2017 रोजी केली होती.याप्रकरणी धन्वंतरीचे डॉक्टर हिमांशु नानक शर्मा यांनी जबाबात गर्भपात किंवा इतर आजारांवर माझ्याकडून औषधोपचार केला जात नाही असे सांगितले होते. या प्रकरणातील सत्यता व वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणार असल्याने करडे कुटुंबाला दिलासा मिळाला.