नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच पारड्यात आपली मतं टाकल्याचं दिसून येतंय. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलंय. ‘जबरदस्त विजयासाठी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन! जनतेच्या कल्याणासाठी तसंच साथरोगामुळे समोर ठाकलेल्या आव्हानाला सामूहिकरित्या सामोरं जाण्यासाठी आपलं कार्य चालू ठेवू’ असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तर, तामिळनाडूमध्ये डीएमकेनं मिळवलेल्या निर्णायक आघाडीसाठी शरद पवार यांनी एम के स्टॅलिन यांचंही कौतुक केलंय. ’आपल्यावर विश्वास व्यक्त करणार्या जनतेच्या सेवेसाठी शुभेच्छा’ असं ट्विट पवारांनी केलंय.