असो, मंगळवारी कोविंद राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. एक सर्वसामान्य कुटुंबातला, झोपडीत राहणारा, दलित वर्गातून आलेला हा माणूस देशाचं सर्वोच्च स्थान ग्रहण करेल. याआधी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे असेच सर्वसामान्य कुटुंबातून देशाचे राष्ट्रपती झालेले व्यक्ती होते. एकेकाळी कानपूर देहात या गावातल्या पराउंख या खेड्यातल्या एका लहानशा झोपडीत राहणारे कोविंद उद्या-परवा तब्बल 2 लाख चौरस फुटांच्या आणि 340 खोल्या असणार्या भव्य अशा राष्ट्रपती भवनात राहायला जातील. हे नक्कीच देदीप्यमान आहे. आम्ही रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. यापुढे भाजपचा, संघाचा चेहरा न लावता ते स्वयंभू प्रतिभेचे राष्ट्रप्रमुख म्हणून वावरतील, असा विश्वास वाटतो. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर आपला काँग्रेसी मुखवटा फेकून दिला होता. त्यांनी केवळ भारतीय आणि फक्त भारतीयच असा निःस्पृह, निष्पक्ष चेहरा धारण केला होता. तशीच अपेक्षा कोविंद यांच्याकडून आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, ज्ञानलालसा असणारे, गरिबांचा कैवार घेणारे, सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारे असे कोविंद हे आपल्यासह भाजप किंवा संघाची ध्येयधोरणे न राबवता स्वतंत्र बाण्यानं कार्य करतील, असे वाटते. तीच अपेक्षा येत्या काही दिवसांनी उपराष्ट्रपती होणारे व्यंकय्या नायडू यांच्याकडूनही आहे. वास्तविक राष्ट्रपतिपदासाठी सर्वमान्य असा तोडगा निघायला हवा होता.
देशाचे सर्वोच्च स्थान असणारे हे पद आहे. यासाठी जी व्यक्ती लायक आहे, तिला पाठिंबा न देता केवळ विरोधासाठी विरोध करून काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी काय मिळवले. भाजपकडे मतमूल्यांचे बहुमत होतेच. त्यामुळे मीरा कुमार यांचा पराभव अटळच होता. विनाकारण, मीरा कुमार यांना आशा दाखवून निवडणूक लढवायला लावली. अर्थात, कोविंद यांनी आपल्या भाषणात मीरा कुमार यांचे मनापासून आभार मानले, ते बरं झालं. त्यामुळे सर्वात्मकता निर्माण झाली. या निवडणुकीत विरोधकांची मते फुटल्याचे म्हटले जाते. विशेषतः महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी कोविंद यांना मत दिले असे बोलले जाते. त्यात तथ्य आहे. भाजप, शिवसेना, त्यांचे मित्रपक्ष आणि अपक्ष यांच्या संख्याबळापेक्षा 12 मते कोविंद यांच्या पारड्यात अधिक पडली. तशीच स्थिती पश्चिम बंगालमध्ये, दिल्लीत, गुजरातमध्ये, गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही होती. म्हणजे हा खेळ मते फोडाफोडीचा होता, असेही म्हणता येईल. कारण, देशाच्या सर्वोच्च स्थानासाठीची ही निवडणूक असून, त्यासाठी आपण किती सक्षमपणे मते द्यायला हवीत हेच या देशातील लोकप्रतिनिधींना कळत नसेल, तर काय म्हणावं! यापुढे असे होऊ नये, याची काळजी त्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या पक्षांनी घ्यायला हवी. जेव्हा निवडणूक अटीतटीची होते, तेव्हाच अशा अवैध अशा मतांचं मूल्य कळतं. असो, कोविंद यांना या त्यामुळे फटका बसला नाही किंवा मीरा कुमार यांच्या पराभवालाही काही फारसा आशावाद नव्हता म्हणून ते चालून गेले, एवढेच. या विजयामुळे रामनाथ कोविंद एका दिवसात जगाच्या पटलावर आले. कोविंद अर्थात, एक उत्तम असे राष्ट्रपती म्हणून आपली कारकीर्द गाजवतील, असे वाटते. कारण त्यांचा साधा, नम्र, मितभाषी, सामंजस्यवादी असा स्वभाव व तितकेच प्रगाढ असे अनुभवसिद्ध ज्ञान होय. त्यांची बिहारची राज्यपाल म्हणून कारकीर्द यशस्वी ठरली होती. आता घटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे मीरा कुमार यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे, ते अचूक आहे. त्यांना मोदींनाही ताब्यात ठेवलं पाहिजे.
कोविंद यांनी सरकारवर नियंत्रण ठेवावे. काश्मीर प्रश्न तर धगधगता आहेच. त्यावर अंतिम व देशहितकारक असा उपाय योजला जावा. देशात भ्रष्टाचार आहेच. तो संपवावा लागेल. ग्रामीण भाग अजूनही प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. तिकडे लक्ष द्यावे लागेल. सत्ताधार्यांना समज द्यायची आणि त्यांना देशविधायक कार्याला जुंपण्याची कामगिरी कोविंद यांना करावी लागेल. रेंगाळणारे कितीतरी प्रश्न अजूनही देशाचं वाटोळं करत आले आहेत. त्यावर ‘अकेला मोदी क्या करेगा?’ असं उपरोधानं म्हटलं जातं. आता नावात ‘राम’ असला तरी देशासाठी ‘नाथ’ असणारे कोविंद यांनी कंबर कसली पाहिजे.
देशाचं सर्वोच्च स्थान हे शोभेचे असता कामा नये. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष बघा. कोविंद यांनी मोदी-शहा किंवा भाजपाच्या बाहुल्याची भूमिका न घेता, स्वतंत्रपणे व बाणेदारपणे आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. त्यांना एक जबाबदारीचे पद मिळाले आहे. त्या पदाची जबाबदारी त्यांनी ओळखली असेलच. बाकी, जे घडणार आहे, ते घडणारच आहे. ते चांगलेच घडावे म्हणून प्रयत्न व्हावेत. चुकीचे काही होण्याआधी वेळीच आवर घातला जावा. रामनाथ कोविंद निश्चितपणे त्यात यशस्वी होतील, असे वाटते!