जबाबदारी ढकलण्यापेक्षा उचलणे अत्यावश्यक!

0

आज आपल्या गरजा वाढल्या आहेत व त्या वाढतच राहणार आहेत. ‘सिंपल लिव्हींग व हाय थिंकिंग’ हा वाक्प्रचार खूपच जुना झाला आहे- आता ‘हाय लिव्हींग व लो थिंकिंग’ असेच सर्वत्र अनुभवास येत आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर स्त्री फारतर सहा महिने किंवा वर्षभर बाळाच्या संगोपनासाठी घरी राहते – नंतर मात्र ‘नोकरी करणे किती आवश्यक आहे’ हे आवश्यक नसले तरी तसे ठरवते. तिचा स्वाभिमान, हक्क, शिक्षण नि महत्त्वाकांक्षा बालसंगोपनापेक्षा सरस ठरतात व मुलाला एखाद्या ‘बाईच्या/दाईच्या’ हाती किंवा पाळणाघरात सोपवून ती घराबाहेर पडते.

पालकांना पर्याय पाळणाघर व निर्जीव खेळ असेच समीकरण आजच्या समाजात दिसून येते. मुलाबरोबर ‘किती’ वेळ घालवला यापेक्षा वेळ ‘कसा’ घालवला हे मुलाच्या वाढीबरोबरच विकासासाठी आवश्यक असते. मुलाची वाढ ही नैसर्गिकच असते पण ‘विकास’ हा संस्कारांवर अवलंबून असतो. हे संस्कार घरी पालकांनी व शाळेत शिक्षकांनी निःस्वार्थपणे घडवायचे असतात. एका पालकाने अभिमानाने सांगितले, “मी रोज माझ्या मुलाला शाळेत ‘ड्रॉप’ करतो स्कूटरवरून!” किती हा सहवास मुलाला आपल्या वडिलांचा!!! मुलाकडे पाहातही नाही कारण मुलगा ‘पाठीशी’ असतो नि संवाद होतो फक्त रस्त्यावर स्कूटर थांबते तेव्हाच!! याला ‘सोबत घालवलेला वेळ’ म्हणायचे का? तुम्हीच ठरवा.
‘भौतिक शास्त्राच्या’ नियमानुसार-कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते उदा. जबाबदारी!! आज अशाच चालढकलापायी अनेक मुले भावनिक, मानसिक व हो, शारीरिक भुकेनेसुद्धा तळमळत आहेत. याचा आपण विचार करायला नको का?… मुलांना ‘करू नको’ म्हणून आज्ञा केली की तेच नेमके करावे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते पण एखाद्या गोष्टीमुळे आपले नुकसान कसे होत आहे हे पटवून दिले की ते ती गोष्ट टाळण्याचा पक्का निश्चय करतात. म्हणूनच शिक्षकांनी व पालकांनी स्वतःच हे समजणे अत्यावश्यक आहे. दूरदर्शन, संगणक नि मोबाइल या तीन वैज्ञानिक आविष्कारांमुळे विश्व अगदी माणसाच्या मुठीत आलंय परंतू त्यांच्या गैरवापरामुळे माणूसच त्यांच्या आहारी जाऊ लागला आहे. ‘असलं तर सूत नाहीतर भूत!’ या तिघांचेही स्वभाव जवळजवळ सारखेच आहेत. माणसानेच निर्माण केलेल्या या भूतांना सूत बनवायचे की त्यांच्या आहारी जाऊन स्वतःच त्यांचे गुलाम बनायचे हे माणसानेच ठरवले पाहिजे. हल्ली निमवयस्कर माणसेच जर त्यांचे गुलाम बनू लागलेत तर नव्या पिढीचे काय?

‘आत जाऊन अभ्यास कर’, असे मुलाला सांगताना पालक मात्र या ‘तिघा मित्रां’बरोबर वेळ घालवत असतो मग मुलाचे लक्ष पुस्तकात कसे लागणार? पुस्तकातली माहिती व चित्रे स्थिर असतात तर हे तिन्ही चोर चलत दृश्ये दाखवून मुलांचे चित्त (मुलांचेच काय मोठ्यांचे सुद्धा) विचलीत करीत असतात. त्यांच्यावर अंकूश ठेवला तर त्यांच्याकडून कल्पनेपलीकडे काम करून घेता येते. म्हणतात ना-‘ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा मार’!!

परीक्षांच्या निकालाबरोबरच प्रत्येक शिक्षक आपल्या विषयांचाही निकाल लावत असे-त्यामुळे त्या त्या विषयात प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा आलेख मिळत असे. चाळीस टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटल्यावर ‘विशेष वर्ग’ घेतला जाई व त्यात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या जात. विद्यार्थ्यांना न कळलेला घटक शिक्षक पुन्हा पुन्हा शिकवून त्याच घटकावर पुन्हा एक घटक चाचणी घेतली जाई.

पालकांनीही हा विचार करावा की आपण घरी नसताना आपली मुले वेळ कसा घालवत असतील? हीच वेळ असते मुलांवर संस्कार घडण्याची. कामानिमित्त मोठी माणसे घराबाहेर, घरात सोबतीला कोणी नाही. अशावेळी मुलांनी काय करावे? पुष्कळदा मुले गैरमार्गाला लागतात- दूरदर्शन, संगणक, दूरध्वनी यांच्यातर आहारी जातातच पण त्याचबरोबर गैरसंगत, गैरसवय यांच्या आहारी जाऊन गैरव्यवहारही करू लागतात. पालकांना काही कळायच्या आतच त्यांची गाडी उताराला लागलेली असते मग ‘मुले’ आमचे ऐकत नाहीत. तुमचे ऐकतील. तुम्ही त्यांना समजवा’ अशा तक्रारी घेऊन पालक शिक्षकांकडे जातात! शिक्षकांचे म्हणणे असते – ‘मूल आमच्याकडे दिवसातील 5/6 तासच असते. बाकीचा वेळ पालकच त्याच्याबरोबर असतात नि जन्म दिलेल्या पालकांचे ऐकत नाहीत ती मुले शिक्षकांचे काय ऐकतील?’ – अशा तर्हेने शिक्षक व पालक दोघेही आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे होतात – यात मुलांचा काय अपराध? – मागे एक विनोद वाचला होता – ‘भौतिक शास्त्राच्या’ नियमानुसार-कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते. उदा. जबाबदारी!! आज अशाच चालढकलापायी अनेक मुले भावनिक, मानसिक व हो, शारीरिक भुकेनेसुद्धा तळमळत आहेत. याचा आपण विचार करायला नको का?

– किरण चौधरी
9823312005