दाभोलकरांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त (खरे तर दाभोलकरांनी ज्या प्रकारे विज्ञानवादाचा बुरखा पांघरूण हिंदूंचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून डॉ. दाभोलकर आणि अंनिस हे अल्पावधीतच विस्मृतीत जाणार आहे, हे निश्चित; कारण चिरकाल टिकणारे सनातन असते. लोक भगवान श्रीकृष्णाच्या कार्याला लक्षात ठेवतात;कंसाच्या नाही. पण असो, केवळ वाचकांना सोयीचे जावे म्हणून स्मृती दिन असा शब्द वापरला आहे.) अंनिस म्हणे जवाब दो हे आंदोलन करणार आहे. दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्याचा जवाब दो असे यांचे म्हणणे आहे. प्रारंभीपासूनच अन्वेषण भरकटवणार्या अंनिसला जवाब दो असे म्हणण्याच्या नैतिक अधिकार उरतो का?, हा खरा प्रश्न आहे.अंनिसचा खोटारडेपणा अंनिसवाल्यांकडून नेहमी विज्ञानवादाची टिमकी गाजवली जाते. सर्व शक्यता गृहीत धरणे हे विज्ञानाचे प्राथमिक तत्त्व आहे. ते तत्त्व बासनात गुंडाळून या कथित विज्ञानवाद्यांनी हत्या झाल्याच्या दिवसापासूनच सनातन संस्थेवर दोषारोप करायला सुरुवात केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तत्परतेने नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनीच ही हत्या केली असे घोषित करून टाकले.
त्यातूनच एकांगी तपास चालू झाला. एखादी हत्या होण्यामागे कौटुंबिक कलह, आर्थिक अपहार, अनैतिक आचरण, पदाची लालसा अशी अनेक कारणे असू शकतात. त्यांपैकी कुठल्याही शक्यता गृहीत न धरता निष्कर्ष काढणे हीच एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे प्रयोग-निरीक्षणे-निष्कर्ष याऐवजी अंनिस आणि पुरोगामी गोतावळा पहिले निष्कर्ष काढून मग निवडक गोष्टी उचलून प्रयोगाची कृती करत आहे. यातूनच अंनिसचा खोटारडेपणा उघड होतो. खटला चालवायला विरोध का? पुरोगाम्यांच्या दबावातूनच दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. सनातनचे कार्य पारदर्शक, तसेच धर्माधिष्ठित असल्याने सनातनला कुठल्याही प्रकारचे भय नाही. यातून सनातनचे सोने तावून सुलाखून निघाल्यावर ते अधिक झळाळणार, याची निश्चिती आहे. त्यामुळे अटक केली, तर खटला चालवा, अशी सनातनची मागणी आहे. दाभोलकर कुटुंबीय मात्र कोर्ट ट्रायलला विरोध करत आहेत. हा दुतोंडीपणा आहे. जवाब दो आंदोलनाच्या अंतर्गत अंनिस म्हणे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची लाखभर भित्तीपत्रके राज्यभर लावणार आहे. वास्तविक अन्वेषण यंत्रणांच्या कार्यकक्षेच्या अंतर्गत यासंदर्भात कृती होतच आहेत. असे असताना अंनिस अनावश्यक भित्तीपत्रके लावण्यासाठी वारेमाप कागदाचा वापर करणार. त्यातून जी पर्यावरणाची हानी होणार, याची अंनिसला चिंता नाही का?
कायद्यांचे उल्लंघन करणारी अविवेकी अंनिस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या न्यासातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी उघड झाले आहेत. सातारा येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या घोटाळ्यांची चौकशी करून त्यात तथ्य असल्याचा 14 पानी अहवाल तयार केला आहे. एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून अंनिसने परदेशी निधी जमवला आहे. नुकतेच केंद्रीय गृहखात्याने त्यांना विदेशी निधी घेण्यावर बंदी घालण्याविषयी नोटीसही बजावली आहे. मग प्रश्न असा पडतो की, प्रतिवर्षी लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा साधा विवेक अंनिसवाल्यांकडे नाही का? अंनिसच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या 20 दिनांकाला ओंकारेश्वर पुलावर जे आंदोलन घेतले जाते, तेही असेच वादाच्या भोवर्यात आहे. या आंदोलनाच्या अनुमतीविषयी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत अनुमती अर्जावरील दिनांकामध्ये फेरफार केल्याचे आढळून आले होते. एकंदरीतच कायद्याचे उल्लंघन करणार्या अंनिसने इतरांना विवेकवादाचे धडे हा विरोधाभास आहे. सार काय, तर ङ्गजवाब दोफ म्हणणार्या अंनिसने प्रथम सनातनद्वेषाच्या उमाळ्यातून मनमानी आरोप करून अन्वेषण भरकटवण्याविषयी, त्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी, अविवेकी आणि अवैज्ञानिक वृत्तीविषयी जवाब द्यावा. ही उत्तरे अंनिस देणार का?, हा खरा प्रश्न आहे.
– अभय वर्तक
राष्ट्रीय प्रवक्ता,सनातन संस्था