पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलैरोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. त्याविरोधात 20 जुलै ते 20 ऑगस्टदरम्यान राज्यभरात ‘जवाब दो‘ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार, खासदारांना निवेदन देणार!
हे सरकार गुन्हेगारांना शोधण्यात अपयशी ठरले असल्याची टीका अविनाश पाटील यांनी केली. या प्रकरणी सरकारने अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे असून, त्यादृष्टीने 20 जुलै ते 20 ऑगस्टदरम्यान ‘जवाब दो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली. पण त्यांना वेळ नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मारेकर्यांची नावे तसेच दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असलेल्या संघटनांची नावे समोर आली असूनही याविरोधात ठोस कारवाई होत नाही. याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा सक्षम आहे, परंतु राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. त्याविरोधात हे ’जवाब दो’ आंदोलन असून, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदाराला भेटून याचा जाब विचारून निवेदन देण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.