माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली राजकीय व्यथा: जब्बार पटेल यांच्या कार्यक्रमात खडसेंचे भाष्य
जळगाव: लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली. यावेळी खडसे यांनी नेहमी प्रमाणेच त्यांच्या खास खुमासदार शैलीत भाषण केले. जब्बार पटेल यांचे चित्रपट राजकारणावर भाष्य करणारेच आहेत. सिंहासन, सामना या चित्रपटातून त्यांनी राजकीय क्षेत्रावर भाष्य केले आहे. जब्बार पटेल यांच्या चित्रपटातील कथानकाचे अनुभव मला माझ्या राजकीय जीवनात आले आहे. पटेलांच्या चित्रपटात मला माझे राजकीय प्रतिबिंब दिसतात असे प्रतिपादन खडसे यांनी केले. जब्बार पटेल दिग्दर्शित एका चित्रपटात ‘मारुती कांबळे याचे काय झाले?’ हा प्रश्न चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांनाच पडला. तसाच अनुभव माझ्या राजकीय जीवनात मला आला. राजकारणात माझे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर मलाच अजून मिळालेले नाही असे सांगत खडसे यांनी त्यांची राजकीय व्यथा पुन्हा मांडली. तसेच त्यांनी यावेळी जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटात काय झाले? याचा हुबेहूब अनुभव गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाने अनुभवल्याचेही खडसे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात शिक्षण हे फक्त काही ठराविक घटकासाठीच होते. त्याकाळात आपल्या जिल्ह्यात शिक्षणाचे दारे उघडी करण्यात लेवा एज्युकेशनल युनियनचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणांना घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे, ते कार्य अविरत सुरु आहे. ही संस्था आज शंभर वर्षाची झाली आहे मात्र अजूनही ही संस्था तरुण आहे असे खडसे यांनी यावेळी सांगितले. माझे शिक्षण या संस्थेत झाले असल्याने मला या संस्थेशी लगाव असल्याचेही खडसे यांनी सांगितले.