जमाखर्च स्वातंत्र्याचा!

0

सत्ता आणि संपत्ती मगरूर झालेल्यांची आहे. शस्त्रास्त्र बाळगून धाक दाखवणार्‍या आणि बेछूटपणे निरपराध्यांची हत्या करणार्‍या दहशतवाद्यांची आहे. धर्माधर्मात आणि जातीजातीत भेदाभेद करून जातीय-धार्मिक दंगली पेटवणार्‍यांची आहे. सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणासाठी कुठलेही मार्ग जोपासणार्‍यांची आहे. सत्ता, आकांक्षा, स्वार्थ, राजकारण यांच्यापायी जनतेला दाव्यास लावणार्‍या ‘खेळ’ करणार्‍यांची आहे. आर्थिक सत्ता आणि पैशाच्या मोहमायेत लडबडणार्‍या स्वार्थांध दुष्टांची आहे. आयुष्याचा चिखल होतानाही वेळीच सावध न होता त्यात अधिकाधिक रुतणार्‍या आणि इतरांनाही रुतवणार्‍या मूर्खांची ही गुलामगिरी आहे. पैशाची अफरातफर करून भ्रष्टाचारानं गडगंज श्रीमंत होणार्‍या कैक मुखवटाधारी लब्ध तिष्ठितांची आहे. सत्ताधारी बदलले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर संपला नाही. त्यानं रूपं बदलली एवढंच. म्हणजेच या देशाची जनता मूठभर भ्रष्टाचार्‍यांच्या गुलामगिरीत जगत होती, आताही जगतेय! ही गुलामगिरी रक्तपिपासू श्‍वापदांची आहे. आपल्या सभोवती वावरणार्‍या नराधमांनी केलंय शांतीप्रिय सर्वसामान्य निष्पाप नागरिकांना ‘गुलाम’- त्यांच्या दंडेलशाहीनं, त्यांच्या संपत्तीनं, त्यांच्या अधिकारानं, त्यांच्या झुंडशाहीनं, हत्यारानं आणि त्यांच्या राजकारणानं! हेच कां ते स्वातंत्र्य? ज्यासाठी भारतभूमीचे गीत गात हसत हसत भगतसिंगराजगुरू-सुखदेव फासावर गेले? हेच का ते स्वातंत्र्य, ज्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची अनन्वित त्याचाराची 50 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगली? ज्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या? टिळक, आगरकर, कर्वे, रानडे, गोखले, फुले, शाहू, आंबेडकरांनी जनजागृती केली? सुभाषचंद्र बोस, मदनलाल, सुखराम, राजगुरू, हुतात्मा शिरीष, बाबू गेनू सारख्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सेनापती बापटांनी लढा दिला. ते ‘हेच’ स्वातंत्र्य होते का? या समस्त महानुभावांना अभिप्रेत-अपेक्षित स्वातंत्र्य ते ‘हेच’ कां, जे आम्ही ‘आता’ भोगतोय? काय मिळालं आम्हाला या स्वातंत्र्यातून? मिळालं काहीच नाही, गमावलं मात्र भरपूर, स्वाभिमान गमावला, आदर्शवाद गमावला, ध्येय गमावलं. या देशाचा एक मोठा अवयव कापून दिला, ज्यानं निर्माण केले जिना, झिया, भुट्टो, शरीफ, मुशर्रफ, कसाब, अफझल गुरू, दाऊद यांसारखे रक्सपिपासू हरामजादे. ज्यांनी आणि ज्यांच्या अवलादांनी लादली तीन-तीन खुली आणि असंख्य अदृश्य युद्धे आपल्या जन्मपित्या देशावर; ज्यांनी घडवलं कारगिल युद्ध, ज्यांनी मारले आमचे सैनिक हकनाक, ज्यांनी घुसवलं अतिरेकी आमच्या भूलोकीच्या नंदनवनात. शीतल बर्फाला ज्यांनी वणवा लावला.

पाकिस्तानने भारताला छळण्याचे अनंत प्रकार केले. अक्षरधामवर हल्ला, संसदेवर हल्ला, विमान अपहरण, अमरनाथ यात्रेवरील हल्ला, काश्मीर बेचिराख करण्याचे षडयंत्र, 26 नोव्हेंबरचा मुंबईवरील हल्ला, मुंबई-दिल्ली-पुणे-बंगळुरू सगळीकडे घुसखोरी, एके 47च्या फैरी, बॉम्बहल्ले, अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले, भारतीय लष्करी तळावर हल्ले, आमच्या जवानांचा शिरच्छेद, सारं करून ते थकले. केव्हातरी ‘समझोता’ झाला होता, तरी ती निखारे झाकलेली मूठ ठरली. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ या काव्यातलं ते… हेच कां ते स्वातंत्र्य? जिथं शाळाशाळांत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आर्थिक कुवतीनुसार फी आकारली जाते? हेच कां ते स्वातंत्र्य- जिथं कुपोषणानं आदिवासी बालके मृत्युमुखी पडताहेत; जिथं महानगरात आणि ग्रामीण भागातही तरुणींवर भर रस्त्यावर सामूहिक बलात्कार केला जातो? जिथं मुलांना दुपारची खिचडी खाऊन प्राणांना मुकावे लागते? जिथं श्रीमंतांच्या पार्टीमध्ये टनभर अन्न उकिरड्यावर फेकावे लागतेय; जिथं एकाच गावात संपन्न बंगले आहेत आणि दुसरीकडे भकास झोपड्या आहेत; ते हेच का स्वातंत्र्य? जिथं शेकडो एकर जमिनीत सोनं पिकतं तिथं शौचालयासाठी जागा मिळत नाही. जिथं लाखो टन कचरा जमा होतो आणि प्रदूषणात शेकडो लोक हकनाक मरतात. जिथं इस्पितळात ऑक्सिजनअभावी साठ-सत्तर बालकांचा मृत्यू होतो. हेच कां ते स्वातंत्र्य जिथं हेच कां ते स्वातंत्र्य, जिथं चौकाचौकांत भरदिवसा धर्मांधता नाचते. मानवता नागवली जाते. संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्यांचं राजरोस वस्त्रहरण होतं. सभ्य आणि सत्याच्या संकल्पनांवर बिनदिक्कत बलात्कार होतो. असाहाय्य मुलींवर अ‍ॅसिड फेकले जाते. ते हे स्वातंत्र्य? इथं आरक्षणाच्या नावाखाली एखाद्या जातीच्या लाखो लोकांना मूकमोर्चा काढावा लागतो. इथं सत्ताधारीच एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांची उणीधुणी काढतात. हेच का ते स्वातंत्र्य जे स्वातंत्र्यसैनिकांना अपेक्षित होतं? हिंसेची आग थैमान घालीत सुटली आहे. बेचिराख करून टाकलंय तिनं स्वातंत्र्याला.

हेच ते स्वातंत्र्य? बेकारी, लाचारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, दारिद्य्र, आर्थिक विषमता, भेदभाव, जातपात, असंतोष, भूकबळी, अंधश्रद्धा, निरक्षरता, अज्ञान, मागासलेपणा, कर्मकांड, धर्मांधता, दंगली, भेदाभेद, अत्याचार, लाचारी, भ्रष्टाचार, हरवली जाणारी माणुसकी… असंख्य समस्यांनी हा देश पोखरून निघालाय… असे आहे हे आमचे स्वातंत्र्य! ज्ञान माउलीनं यासाठीच पसायदान मागितलं होतं का?‘दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहों। जो जे वांछिल तो ते लाहो। प्रणिजात॥’ सातशे वर्षांनंतर काय घडणार आहे हे त्या माउलीला तेव्हाच माहीत असतं तर त्यांनी ‘आदिपुरुषा’कडे हे पसायदान मागितलंच नसतं… असो! तर स्वातंत्र्याला यंदा 70 वर्षे पूर्ण झाली. पण कुठंय ते स्वातंत्र्य? कुणाला कदर आहे त्या स्वातंत्र्य संग्रामाची? त्यात बळी गेलेल्या हुताम्यांची? त्यांच्या राखरांगोळी झालेल्या घरादारांची? आणि आम्ही आपलं घर- आपलं कुटुंब-आपली माणसं याच स्वार्थात परमार्थ शोधणारी आपण आपली ‘स्वतंत्र’ माणसं…! कुणाला याद आहे त्या महात्म्यांच्या बलिदानाची? कुर्बानीची? हल्ली कोणाचे डोळे भरून येतात त्या बलिदानानं? नाहीच!