जळगाव : दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीनंतर दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण करण्यात आली मात्र या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मारेकर्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलिसांकडे केली आहे. प्रमिला दिलीप सोनवणे (57, दापोरा, ता.जि.जळगाव) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
कट मारल्याच्या गैरसमजातून मारहाण
प्रमिलाबाई सोनवणे या दोन मुले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला आहे. बुधवार, 18 मे रोजी दापोरा गावात लग्न असल्याने बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण लग्नाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा विजय हा ओट्यावर बसला होता. त्याच वेळी घरासमोरून कार जात असतांना एकाने दुचाकीचा कारला कट मारला व पसार झाला. कारचालकाने पुढे कार नेवून थांबविली व ओट्यावर बसलेल्या विजयनेच कट मारल्याचा गैरसमज करून त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व लग्नाच्या ठिकाणी निघून गेला. दरम्यान, अज्ञात कारचालक हा कार घेवून लग्नाच्या ठिकाणी जावून पुन्हा 10 ते 15 जणांना घेवून येत विजय सोनवणे याला मारहाण करू लागला व हा प्रकार पाहून विजयची आई प्रमिलाबाई, भाऊ अरुण आणि विजयची पत्नी प्रियंका हे आवराआवर करण्यासाठी आले. यात जमावाकडून चौघांना मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता रविवारी 22 मे रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दोषींवर कारवाईची मागणी
महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जमावाला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृताच्या नाईवाईकांनी जळगाव तालुका पोलिसांकडे केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.