मावळ : तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जमिनींचे विभाजन, खातेफोड अथवा वाटणीपत्र करण्यासाठी गुरुवारी (दि. 27) मंडलनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार असून भूमिहीन शेतमजूर, शिया व सुन्नी समाजाच्या वक्फ जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.
एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीतील हिश्श्यांचे विभाजन करण्यासाठी यापूर्वी अनुसूचित जमातीच्या लोकांना जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करावा लागत होता. परंतु जुलै महिन्यात महसूल व वन विभागाने दिलेल्या शासन निर्णयानुसार हे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तहसीलदार देसाई यांनी मावळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जमिनींचे विभाजन, खातेफोड, वाटणीपात्र करण्यासाठी मंडलनिहाय शिबिराचे आयोजन केले असून त्याच ठिकाणी 27 रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये शेतकर्यांनी अर्ज दाखल करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कूळ वहिवाट शेतजमीन अधिनियमान्वये भूमिहीन शेतमजुरांचे सर्वेक्षणही करण्यात येणार असून वक्फ अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार शिया व सुन्नी समाजाच्या वक्फ जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे तहसीलदार देसाई व नायब तहसीलदार भोसले यांनी सांगितले.