पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, व अन्य काही जणांविरुद्ध भोसरीतील जमीन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असून, त्यापूर्वी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणाचा अप्पर पोलिस महासंचालकाच्या देखरेखीखाली चौकशी करा, असा आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 8 मार्चरोजी दिला होता. त्यानुसार एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 (1) ड, (2), 15 आणि भादंवि 109 प्रमाणे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, उकाणी आणि इतर अज्ञातांविरुद्ध दाखल केला आहे.
उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया
आ. खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी एमआयडीसीतील जमीन आपल्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केला असून, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. गावंडे यांनी 30 मे 2016 रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जासच फिर्याद समजण्यात यावे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 8 मार्चरोजी दिला होता. न्यायमूर्ती झोटिंग यांची समितीही या प्रकरणाची चौकशी करत होती. मात्र, न्या. झोटिंग यांची समिती चौकशी करणार असली, तरीही अप्पर पोलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली हा तपास करण्याचे आदेशही न्यायालयाने 8 मार्चला दिले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई गिरीश चौधरी, उकाणी व अन्य अज्ञातांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेली ही प्रक्रिया मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू राहील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रसाद हसबनीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही येथे सांगण्यात आले.
आरोपांत काहीही तथ्य नाही : आ. खडसे
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. यापूर्वी पोलिस आणि इतर यंत्रणांमार्फत माझी चारवेळा चौकशी करण्यात आली. मात्र, प्रत्येकवेळी माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नव्हते. पोलिसांनी उच्च न्यायालयात तसे सांगितलेही होते. मात्र, ही सर्व चौकशी सुरू असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे यावेळी गुन्हा दाखल करून चौकशी केली जावी, असा आदेश न्यायालयाने दिला. आता माझी पाचव्यांदा चौकशी होणार आहे. मात्र, यावेळीही चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वास आ. एकनाथ खडसे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना व्यक्त केला.