जमीन संपादनापूर्वीच करी रोड पुलाचे बांधकाम सुरू

0

मुंबई । करी रोड रेल्वेस्थानकातून बाहेर जाण्यासाठी एकच पादचारी पूल आहे. एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सध्या भारतीय लष्कराच्या मदतीने केले जात आहे. पुलासाठी भूखंडाची जागा संपादन करण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने येथील मेसर्स गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून ही जागा आधीच ताब्यात घेतली. हा ताबा महापालिकेने घेऊन तो रेल्वे प्रशासनाकडे त्याच दिवशी दिला. मुंबईतील करीरोड रेल्वेस्थानकावर लष्कराच्या माध्यमातून पादचारी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या बांधकामासाठी मैदानांची जागा वापरली जात आहे. या जागेचे संपादन सुरू होण्यापूर्वीच रेल्वेने लष्कराच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे. रेल्वेने महापालिकेला सुमारे साडेपाच कोटी रुपये देऊन ही जागा संपादित करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

आता जमीन संपादनाचा सर्व खर्च हा रेल्वे प्रशासन करणार असून रेल्वे प्रशासनाने 28 नोव्हेंबर 2017 ला या जमिनीची आगाऊ रक्कम म्हणून 5 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. ही जमीन संपादन करण्याचा हा प्रस्ताव सुधार समितीपुढे मान्यतेसाठी आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार ही जागा मनोरंजन मैदान व रस्ता यासाठी राखीव आहे. सुमारे 249 चौरस मीटर क्षेत्रफळाची ही जागा आहे. जमीन मालकाने आरक्षित जमिनीच्या बदल्यात हस्तांतरित विकास हक्क अर्थात टीडीआर नको, असे महापालिकेला कळवल्यामुळे या जागेच्या संपादनासाठी रक्कम देण्यात येत आहे.

अशी तत्परता नेहमी का नसते?
उपरोक्त पुलासाठी अवघ्या 1 दिवसात जागा उपलब्ध करून दिल्यामुळे काम तातडीने सुरू होणे शक्य झाले. मात्र, महापालिकेच्या उड्डाणपुलांसाठी तसेच पादचारी पुलांसाठी रेल्वेकडे पैसे जमा करूनही या कामांना गती मिळत नाही. करी रोडच्या पुलासाठी जमीन संपादन होण्यापूर्वीच त्याचा ताबा देऊन रेल्वेला काम करायला महापालिकेकडून सहकार्य केले जात आहे. पण महापालिकेच्या इतर पुलांची कामे मात्र रेंगाळलेली आहेत.