श्रीनगर- जम्मू शहरात एका माजी आमदाराच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्याच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा दिसत असल्याने खळबळ माजली आहे. हरयाणाचा रहिवासी असलेल्या या जवानाचे नाव हेडकॉन्स्टेबल गजसिंग असे आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार मोहम्मद सईद अखून यांच्या निवासस्थानी मध्यरात्री गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर गजसिंग मृतावस्थेत जमिनीवर पडलेला सुरक्षा रक्षकांना दिसला. जखमी अवस्थेत गजसिंग याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह सीआरपीएफकडे सुपूर्द करण्यात आला.