जम्मू-काश्मिरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सुरु !

0

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पाच ऑगस्टपासून गेले १२ दिवस राज्यातील जनजीवन काही प्रमाणात विष्कळीत झाले होते. दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान आज शनिवारपासून काश्मीरमधील दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूमध्ये दूरध्वनीसह २ जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल १२ दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी काल शुक्रवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषद घेतली होती. दहशतवादी संघटनांनी काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला गेला. गेल्या १२ दिवसांत हिंसाचाराची वा जीवितहानीची एकही मोठी घटना घडलेली नाही. राज्याच्या १२ जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत असून केवळ पाच जिल्ह्य़ांत रात्री किमान निर्बंध असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.