श्रीनगर: केंद्र सरकारने काल ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लद्दाक हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. याचे विपरीत परिणाम उमटतील अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता असून आणि परिस्थिती सामान्य आहे. तसेच चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे येथे एकही हिंसाचाराची घटना घडली नसल्याचे जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारपर्यंत जम्मू-काश्मीरमधील अनेक संवेदनशील भागात संचारबंदी लागू राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीआरपीएफचे प्रमुख आर. आर. भटनागर श्रीनगरमध्ये थांबून आहेत. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर गृहमंत्री अमित शाह देखील येथे भेट देणार आहेत.
३७० रद्द केल्यानंतर कुठल्याही अप्रिय घटना येथे घडलेल्या नाहीत, कोणत्याही प्रकारची आंदोलने येथे होताना दिसत नाहीत. काही ठिकाणी स्थानिक लोक आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहे.