पुलवामा: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लार येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहेत.
या परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती.
त्राल परिसरात काल संध्याकाळपासून चकमक सुरू झाली होती. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये श्रीनगर येथील फारूक लंगू व मोसीन, बिजबेहाडा समथन येथील शाहिद भट यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे अद्याप सांगतिलेले नाही.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला.
जम्मू- काश्मीरमधील विविध भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या अगोदर जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.