जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींची मान्यता

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपाने मंगळवारी पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले.

राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्याने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सरकार स्थापण होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशा शिफारशीचा अहवाल जम्मू-काश्मीरच्या राज्यापालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. मात्र, कोणीही पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा न दर्शवल्याने अखेर राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवून दिला. यामध्ये त्यांनी राज्यघटनेच्या कलम ९२ अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.