नवी दिल्ली : अशांत झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. फुटीरतावाद्यांनी आक्रमक भूमीका घेतल्याने लष्करावर दगडफेक करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काश्मीरमधील याच सुरक्षेच्या मुद्यावर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हुर्रियत नेत्यांशी चर्चा करण्यासाठी गळ घातली. दरम्यान, मुफ्ती यांचे हे प्रयत्न सुरू असतानाच सत्ताधारी पक्ष पीपल डेमोक्रॅटिक पार्टीचे पुलवामा जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात काश्मीर खोर्यात दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या दंगेखोरांना रोखण्यासाठी लष्कराकडून करण्यात येणारा पॅलेट गन्सचा वापरही वादाचा मुद्दा ठरला आहे. तर दहशतवद्यांनी स्थानिक तरूणांना चिथावणी देण्यासाठी सुमारे 300 व्हॉटसअप ग्रुप्स तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
मेहबूबा मुफ्ती दिल्लीत
सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काश्मीरमधील सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा केली. राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्यावर भर देण्याची विनंती मुफ्ती यांनी मोदींना केली. जम्मू काश्मीरमधील हिंसाचार उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा मुफ्ती या सोमवारी राजधानी दिल्लीत सकाळी दाखल झाल्या होत्या. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींची त्यांनी भेट घेतली. राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करावे, अशी विनंतीही त्यांनी केली. हुर्रियतच्या नेत्यांसोबत चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
अब्दुल गनी डार रुग्णालयात
जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी पक्ष पीपल डेमोक्रॅटिक पार्टीचे पुलवामा जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या आधी पीडीपी नेते आणि मंत्री फारुख अंद्राबी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी ते घरी नव्हते. अंद्राबी यांच्या सुरक्षारक्षकांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीमध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाले होते.
चिथावणी देणारे 300 व्हॉटसअॅप ग्रुप्स
काश्मीर खोर्यात दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काश्मीर खोर्यात लोकांना दगडफेक करण्यासाठी चिथावणी देणार्या तब्बल 300 व्हॉटसअप ग्रुप्सवर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. 90 टक्के ग्रुप्स बंद करण्यात आले आहेत. दगडफेक करण्यासाठी दहशतवद्यांकडून लोकांना व्हॉटसअॅपच्या माध्यमातून चिथावणी दिली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. या ग्रूप्सच्या माध्यमातून लष्करी कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी दगडफेक करण्यासाठी लोकांना भडकावले जात आहे.