जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला

0

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे, तर 5 जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर अनंतनाग-काजीकुंडजवळ जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर महामार्ग बंद करण्यात आला आहे. सैन्याचा ताफा श्रीनगरकडून जम्मूकडे जात होता. मात्र, अचानक रस्त्यात साधारण दोन ते तीन दहशतवाद्यांनी सैन्याच्या ताफ्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या दहशतवादी हल्ल्यात सैन्यातील 5 जवान जखमी झाले आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका जखमी जवानाचा मृत्यू झाला. जवानांनी या संपूर्ण परिसराला वेढले असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या हल्ल्यानंतर महामार्ग बंद करण्यात ाला आहे. साधारण 2 ते 3 दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा महामार्ग नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतो. काही दिवसांपूर्वी येथे अलर्टही जारी करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. रात्रभर पाकिस्तानकडून थोड्या-थोड्या वेळाने गोळीबार सुरूच होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.