श्रीनगर : जम्मू-काश्मीर राज्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता राज्याला या दलदलीतून बाहेर काढू शकतील. मोदी जो निर्णय घेतील, त्याला आपण पाठिंबा देऊ, असे अत्यंत हताश उद्गार राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी काढले. जम्मू-काश्मीरमध्ये अंतर्गत कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, फुटिरतावाद्यांकडून जोरदार दगडफेक व हिंसक आंदोलन सुरु आहे. तसेच, दहशतवादी कारवायांनीदेखील उचल खाललेली आहे. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांनीच केंद्र सरकारने राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी साकडे घातले आहे. राज्याला या दलदलीतून बाहेर काढण्याचे काम केवळ मोदीच करू शकतात, ते जो निर्णय घेतील त्याला राज्यातील जनता पाठिंबा देतील, असे सांगून मोदींच्या लाहोर भेटीचेही त्यांनी समर्थन केले. यापूर्वीचे पंतप्रधानही लाहोरला जाऊ इच्छित होते; परंतु त्याची गरज नव्हती. मोदी लाहोरला गेले ही बाब आपली ताकद दाखविते, असेही मुफ्ती म्हणाल्यात.
युपीएमुळेच काश्मीरप्रश्न बिघडला..
महिलांविषयक एका कार्यक्रमात बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, की काश्मीरची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. या परिस्थितीचे दुष्पपरिणाम जम्मूलादेखील भोगावे लागू शकतात. काश्मीरचा प्रश्न सात दशकांपूर्वीचा असून, तो कशा प्रकारे सोडवावा हाच मोठा प्रश्न आहे, असे सांगून त्या म्हणाल्यात, की आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीर शांतता प्रक्रियेची सुरुवात केली होती. परंतु, नंतरच्या काळात आपले वडिल राहिले नाहीत अन् वाजपेयी यांचे सरकारही राहिले नाही. त्यामुळे सुधारणा प्रक्रिया बंद पडली. युपीए सरकारला काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्यासारखे वाटत होते. परंतु, वास्तवात तसे नव्हते. त्यामुळेच आजरोजी काश्मीरमधील परिस्थिती आणखीच बिघडलेली आहे.
कायदा हातात घेणार्यांना सोडणार नाही!
या राज्यात कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही लोकं काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करत आहेत. त्या लोकांना शांततेचे जीवन नको आहे. परंतु, कायदा हातात घेणार्यांना माफ केले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच काश्मीर समस्येचे निदान करू शकतात. मोदींचे लाहोर जाणे ही कमजोरी नाही तर एनडीए सरकारच्या ताकदीचे प्रतिक आहे. मोदी या राज्यासाठी जो काही निर्णय घेतील, त्याला आपण व राज्यातील जनता पाठिंबाच देतील, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी याप्रसंगी सांगितले.