श्रीनगर । वृत्तसंस्था । बुधवारी दुपारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्राल परिसरात सुरक्षा दलानं ही कारवाई केली. चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी हे झाकीर मूसाच्या गझवत-उल-हिंद या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कुपवाडा जिल्ह्यात मंगळवारी पाच दहशतवाद्यांना ठार केल्यानंतरच्या या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.
शोधमोहीत सुरूच
पुलवामातील त्राल परिसरातील गुलाब बाग गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती बुधवारी दुपारी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गावाला घेरलं आणि शोधमोहीम सुरू केली. याते जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत झाकीर मूसाच्या संघटनेतील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून चौथ्यालाही टिपण्यात आल्याचे वृत्त आहे. ठार झालेल्यांमध्ये इशाक अहमद, झाहीद अहमद आणि अल्ताफ अहमद यांचा समावेश असून इशाक आणि झाहीद हे दोघेही त्रालमधील तर अल्ताफ हा शोपियानमधील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर सुरक्षा दलाच्या जवानांनी हाती घेतलेली शोधमोहीम सुरूच आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.