जयंत पाटील यांना ‘बेस्ट चेअरमन’ राष्ट्रीय पुरस्कार

0

अलिबाग । सतत 20 वर्षे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी काम पाहणारे आमदार जयंत पाटील यांना यावर्षीचा बँकिंग फ्रंटीयर्स तर्फे दिला जाणारा बेस्ट चेअरमन हा राष्ट्रीय पुरस्कार दिनांक 7 सप्टेंबर रोजी राजस्थान मधील जयपूर येथे शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. बँकिंग फ्रंटीयर्स ही संस्था प्रतिवर्षी देशातील सर्व सहकारी बँकांचे तसेच बँकांमध्ये काम करणारे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या कामाचे मूल्यमापन करून हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करीत असते. यावर्षी संपूर्ण देश भरातून जवजवळ 550 प्रस्तावातून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सहकारी बँकांसाठी हा पुरस्कार फार प्रतिष्ठेचा समजला जातो. बँकिंग क्षेत्रातील तसेच सहकार क्षेत्रातील नामवंत मान्यवर या निवड समितीवर कार्यरत असून ते पुरस्कारांची निवड करतात. 1997 सालापासून आमदार जयंत पाटील हे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

15 वर्षे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध; बँकेचा चेहरा मोहरा बदलला
आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकाळात मागील 15 वर्षे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून येत आहे. 1997 मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला पाहायला मिळतो. त्यावेळी फक्त 150 कोटींचा व्यवहार असणार्‍या बँकने आज 3000 कोटींचा व्यवसायाचा पल्ला गाठलेला असून हे करीत असताना बँकेची कर्जवसुली प्रभावी ठेवून मागील 10 वर्षे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राखून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बँकेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यामुळे बँकेच्या ठेवी आज 1800 कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. बँकेने शेतीकर्ज वाटपामध्ये सुद्धा आघाडी घेतलेली असून मागील 10 वर्षे बँकेची शेती कर्ज वाटपाची वसुली 100% आहे.