पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद जयकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या जयकर ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीला सोमवारी 60 वर्षे पूर्ण झाली. पुणे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर टाकणारी जयकर ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यासाधारण आहे. अनेक जुन्या पुस्तकांचा ठेवा असणारे आणि काळानुरूप तंत्रज्ञानाला आपलंस करणारे हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खजिना ठरत आहे.गेल्या 60 दशकांहून अधिक काळ या ग्रंथालयाने लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाचा महासागर उपलब्ध करून दिला आहे. येथील अभ्यासिकेत दररोज शेकडो विद्यार्थी अभ्यास करीत असतात. जुनी लाकडी बैठक व्यवस्था असूनही, ग्रंथालयाच्या वेगळे स्थान आजही कायम आहे. जुन्या दगडी बांधकामाने ग्रंथालयाची इमारत आजही दिमाखात उभी आहे.
या ग्रंथालयात आजमितीला 5 लाख पुस्तके आहेत. त्यामध्ये साडेतीन लाख पुस्तके, तर दीड लाख नियतकालिकांचे एकत्रित केलेले संच आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाचे सर्व 8 हजार 800 प्रबंधांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून हे सर्व प्रबंध वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 4 हजार 500 दुर्मिळ पुस्तके आणि दुर्मिळ हस्तलिखिते सुद्धा येथे उपलब्ध आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न. चिं. केळकर अशा महान पुरुषांची पत्रे सुद्धा येथे जतन करण्यात आली आहेत.
आंबेडकर दालन
आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आंबेडकर दालनही येथे सुरू करण्यात आले असून, यात आंबेडकरांनी लिहिलेली तसेच आंबेडकरांवरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांची दुर्मिळ छायाचित्रेही येथे पाहायला मिळतात. अनेक दुर्मिळ ग्रामोफोन असून त्यावरील गाण्यांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. लवकरच यावरील गाणी विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत. जुन्या ग्रंथसंपदेचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा सांगड घालण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. येथील अफाट ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना खुली असून, ती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहेत, असे जयकर ग्रंथालयाच्या प्रभारी संचालिका अर्पणा राजेंद्र यांनी सांगितले.