जयकिसनवाडीत लाकडी इमारतीला भीषण आग

0

जळगाव । शहरातील जयकिसनवाडीतील नवजीवन मंगलकार्यालया समोर असलेल्या जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने आग दिवसा लागल्याने आणि काही घरे रिकामे असल्याने प्राणहानी झाली नाही. नवजीवन मंगलकार्यालयात असलेल्या लग्नात लावलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर घरावर कब्जा करणार्‍या इसमानेच ही आग लावल्याचे घरमालकांचे म्हणणे होते, असे वेगवेगळे कारण घटनेदरम्यान समोर येत होती. दरम्यान, महानगरपालिकेचे आठ अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण होताच दोन तासांच्या प्रयत्नानंतर इमारतीला लागलेली आग विझविण्यात अग्निशमन कर्मचार्‍यांना यश आले. परंतू आगीत संपूर्ण इमारत ही जळून खाक झाली होती.

ऑईल फिल्टर व साहित्य पडून
जयकिसनवाडीतील नवजीवन मंगलकार्यालयासमोर असलेल्या लाकडी इमारतीत सहा घरे आहेत. त्यातील विनायक रामदास दिक्षीत यांच्या मालकीचे मंगलकार्यालयाकडील कोपर्‍याचे दोन मजले आहेत. त्यातील तळ मजल्यावर रमेश भिमजी सेठ यांनी अरूण प्रल्हाद कस्तुरे यांना भाड्याने दिलेले आहे. कस्तुरे यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. गॅरेजच्या वस्तू ठेवण्यासाठी ते या घराचा गोडाऊन म्हणून उपयोग करतात. त्यात ऑइल, ऑइल फिल्टर तसेच इतर साहित्य पडलेले असते. घराचा मागचा भाग कोसळ्याने दिक्षीत पिंप्राळा परिसरात राहण्यासाठी गेले आहेत. तर त्यांच्या बाजुचे दोन मजले बन्सीलाल रसवंतीचे मालक आनंद बन्सीलाल राणा यांच्या मालकीचे आहेत. ते सुद्धा या ठिकाणी राहत नाहीत. त्यांनी अडगळीचे साहित्य या घरात ठेवलेले आहेत. तर कोपर्‍याच्या वरच्या मजल्यावर उन्मेश यशवंत चौधरी तर खालच्या मजल्यावर दीपक प्रकाश चौधरी हे त्यांची आई रोहीनी प्रकाश चौधारी यांच्या सोबत राहतात.

डिवायएसपींची घटनास्थळी भेट
घटनास्थळापासून जवळच असलेल्या शहर पोलिस ठाण्यात दुपारी 4 वाजेपर्यंत आगीची माहितीच नव्हती. उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना काही उपस्थितांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते तत्काळ घटनास्थळावर उपस्थित झाले. त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनां चांगलेच सुनावले. त्यांनतर कर्मचारी व अधिकार्‍यांचा चांगलाच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तर आगीच्या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत घरात महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाकडून पाण्याचा मारा करण्यात येत होता. तर संपूर्ण ऑईल फिल्टरही आगीत जळालेले दिसले.

घटनास्थळी दोन गटांमध्ये हाणामारी
सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आग विझवत असताना विनायक दिक्षीत यांनी आग विझविणार्‍याला काठीने मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी विनायक दिक्षीत यांना त्याचा जाब विचारला. त्यामुळे दोन्ही गटात हाणमारी झाली. मात्र काही जणांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

या प्रकरणी विनायक रामदास दिक्षीत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात अरूण कस्तुरे यांनी अवैधरीत्या ठेवलेल्या ज्वलनशील वस्तू आणि पदार्थांमुळे आग लागून सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले असल्याचा तक्रारी म्हटले आहे. तसेच अरूण कस्तुरे याने मालमत्ता हडप करण्यासाठी हा प्रकार केला असून आग ही नियोजीत असल्याचेही दिक्षीत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ऑईलमुळे आगीचे रौद्ररूप
अरूण कस्तुरे यांच्या ऑईलचे सामान ठेवलेल्या गोडाऊनला सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण गोडावूनमध्ये आग पसरताच गोडाऊनमध्ये ऑइल आणि ऑइल फिल्टर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यातच इमारत लाकडी असल्याने आग अधिकच वाढली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 8 बंबांनी दोन तास आग विझवण्याचा प्रयत्न केला. ऑइल मुळे पाणी टाकल्यामुळे आग अधिकच पसरत होती. शेवटी जैन इरिगेशन कंपनीचा बंब मागविण्यात आला. त्यानंतर त्यांच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे संपूर्ण जयकिसनवाडीत धुराळा पसरला होता. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिक देखील धावपळ करीत होते. परंतू आग रौद्ररूप धारण करत असल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांसह कर्मचार्‍यांनाही अपयश येत होते.

वेगवेगळी कारणे आली समोर…
जयकिसनवाडीत नेमकी आग कशामुळे लागली याचे वेगवेगळी कारणे परिसरातील नागरीकांनी सांगितली. त्यातील घर मालक विनायक सुतार यांनी रमेश भिमजी सेठ याने अरूण कस्तुरेला सांगून घराला आग लावल्याचा आरोप केला. तर रोहिनी प्रकाश चौधरी यांनी सांगितले की, नवजीवन मंगलकार्यालयात असलेल्या लग्न कार्यात फोडलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याचे सांगितले. तर काही प्रत्यक्षदर्शींनी विजेच्या मीटरमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे ठोस कोणीही सांगितले नाही. दरम्यान, सायंकाळी आगविझविण्याच्या कारणावरून दोन गटात किरकोळ हाणामारी झाली. यानंतर घरमालक यांनी तक्रार दाखल केली आहे.

धुराचे साम्राज्य…
जयकिसनवाडीतील लाकडी इमारतीला लागलेल्या आगीमुळे जयकिसनवाडीसह, नवीपेठ, विसनजीनगर, न्यायालय परिसर, रेल्वेस्थानक परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. तर अग्निशमन बंबातर्फे पाण्याचा मारा केल्यानंतर घरातून मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याने घटनास्थळाजवळ जवळचेही दिसत नव्हते. तर या धुरामुळे डोळ्यांनाही त्रास होत असल्यामुळे कर्मचार्‍यांनाही आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, घराचा दरवाजा तोडून पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण आले. परंतू परिसरात तरी देखील मोठ्या प्रमाणात धुर पसरले होते.

मदतकार्यासाठी तरूणांची धावपळ
जयकिसनवाडीत वास्तव्यास असलेले नगरसेवक श्याम सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अग्निशमन विभागाला फोन करून तत्काळ बंब बोलावून घेतले. तर परिसरातील तरूणांनी दरवाजे तोडून घरातील साहित्य बाहेर काढले. तर काही तरूणांनी वाड्याचा मागचा दरवाचा तोडून रोहिनी चौधरी यांच्या घरातील गॅस सिलिंडर उचलून बाहेर आणून ठेवले. नंतर जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीतून बालट्यांनी आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर आगीवर कसे नियत्रंण मिळवता येईल यासाठी तरूण देखील धावपळ करीत असल्याचे दिसून आले.