जयललितांच्या पक्षाचे दोन्ही गट येणार एकत्र

0

चेन्नई : तामिळनाडूमधील राजकारणात मोठ्या घडोमोडी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार आहेत. एक गट जयललितांच्या जवळच्या शशिकला यांचा आहे. शशिकला सध्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री पलानीसामी त्यांच्याच गटाचे आहेत, तर दुसरा गट ओ. पन्नीरसेल्वम यांचा आहे. यामुळे पन्नीरसेल्वम गटाचे दोन्ही मंत्री सरकारमध्ये सामील होऊ शकतात. तसेच शशिकला आणि दिनाकरन यांनाही पक्षातून बाहेर काढले जाणार आहे.

शशिकलांवर मुख्यमंत्री पलानीसामी नाराज
5 डिसेंबर 2016 रोजी आजारपणानंतर जयललिता यांचा मृत्यू झाला. यानंतर एआयएडीएमकेचे दोन गटांत विभाजन झाले. शशिकला यांनी ओ. पन्नीरसेल्व्हम यांना बाजूला सारून पलानीसामी यांना सीएम बनवले होते. शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पक्षाचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी दिनाकरन यांनी पक्षात अनेक पदे भरली. यामुळे मुख्यमंत्री पलानीसामी नाराज होते. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी दिनाकरण यांनी भरलेली सर्व पदे रद्द केली आहेत. यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांत चर्चा सुरू झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पलानीसामी यांनी गुरुवारी पक्षाच्या 27 सदस्यांची मीटिंग बोलावली. यात दिनाकरण आणि शशिकला यांना दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री
शशिकला आणि दिनाकरनसह जयललिता यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला पक्षात ठेवू नये, अशी पन्नीरसेल्वम गटाची मागणी होती. मुख्यमंत्री पलानीसामीही पक्ष आणि सरकारमध्ये शशिकला तसेच दिनाकरन यांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होते. म्हणून त्यांनीही पन्नीरसेल्वम यांची मागणी सहज मान्य केली. पुढच्या आठवड्यात दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. यासाठी पक्ष मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम दोघेही एकत्र येण्याची शक्यता आहे. पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या समर्थकांना कॅबिनेटमध्ये सामावून घेतले जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, केंद्रात भाजप सरकारला समर्थन देऊन एआयएडीएमके पक्ष हा एनडीएमध्ये सुध्दा सहभागी होऊ शकतो.