जयललितांच्या भाचीला धमक्या

0

चेन्नई : जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, आर. के. नगर मतदारसंघात 12 एप्रिल रोजी होणारी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचे जाहिर केल्यानंतर त्यांना गुंडांकडून धमक्या येऊ लागल्या आहेत.

एआयएमडीके पक्षाच्या प्रमुख शशिकला यांच्या गटावर संशय व्यक्त करत दीपा म्हणाल्या की, मी ज्या दिवसापासून आर. के. नगर मतदार संघाची पोट निवडणूक लढण्याचे जाहिर केले आहे तेव्हापासून मला विविध मार्गाने त्रास देण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. सध्या मी माझ्या घरात सुध्दा राहू शकत नाही. गुंडांना पाठवून मला धमकाविण्यात येत आहे. मला पोटनिवडणूक लढविण्यापासून दूर करण्यासाठी विविध षडयंत्र रचण्यात येत आहेत. त्रास देण्यात येत आहे.
दीपा यांनी असाही आरोप केला की, मागच्या वर्षी जयललिता हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांच्यापर्यंत जाऊ दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंत्यसंकारापासूनही मला दूर ठेवण्यात आले, असे त्या म्हणाल्या. धमकी सत्रामुळे त्रस्त झालेल्या दीपा यांनी रविवारी रात्री जयललिता यांच्या मरिना बीच येथील स्मृतीस्थळाला भेट देऊन तेथे ध्यान व प्रार्थना केली. जयललिता यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून दीपा जयकुमार या मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.