चेन्नर्ई । तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अन्ना द्रमुक पक्षाच्या नेत्या जे. जयललिता यांच्या मृत्यूची मद्रास उच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री इडाप्पडी के. पलानीसामी यांनी गुरुवारी केली. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र आयोगही त्यांनी गठीत केला आहे. जयललिता यांचे निवासस्थान असलेल्या पोएस गार्डनला त्यांनी संरक्षित स्मारकदेखील जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पक्षप्रमुख व्ही. के. शशिकला यांना जोरदार झटका बसला आहे. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष कोण असतील ते लवकरच जाहीर करू, असेही मुख्यमंत्र्यांनी राज्य सचिवालयात आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत सांगितले.
काय झाले, चौकशी करू! ः माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणार्या आयोगाला विहित मुदतीत आपला अहवाल द्यावा लागणार असून, लवकरच या आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा केली जाईल, असेही मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांनी सांगितले. स्व. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबत राज्यातील जनतेने मागणी केली होती. या मागणीची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे, त्यानुसारच हा चौकशी आयोग गठीत करण्यात येत असल्याचे पलानीसामी म्हणाले. माजी मुख्यमंत्री व आपल्या सर्वांच्या अम्मा यांना अतिशय सुस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या आनंदी मुद्रेने रुग्णालयात जाताना सर्वांनी पाहिले होते. परंतु, 5 डिसेंबररोजी त्यांचा मृत्यू झाला. त्या वैद्यकीय उपचारास प्रतिसाद देत नव्हत्या इतके त्यांचे शरीर थकले होते. या सर्व घटनेची आणि त्यांच्या मृत्यूची आता चौकशी आयोगामार्फतच चौकशी केली जाईल, असेही पलानीसामी यांनी स्पष्ट केले.
संशयाचा कल्लोळ
स्व. जयललिता या राज्याच्या 6 वेळा मुख्यमंत्री राहिल्यात. त्यांचे संपूर्ण जीवन राज्यातील जनतेसाठी रात्रंदिवस विचार करत होत्या. राज्याला प्रगतिपथावर नेणार्या अतिशय शालिन अशा नेत्या त्या होत्या. प्रत्येकाच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांचे पोएस गार्डन हे निवासस्थान स्मारक घोषित करावे, अशी मागणी जनतेची होती. जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या निवासस्थान आता संरक्षित स्मारक जाहीर करत आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केली. शशिकला यांचाच जयललितांच्या मृत्यूमागे हात असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेला संशय आहे.