जयललितांना नमन, राणेंची चिमटेगिरी

0

नागपूर (निलेश झालटे) हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस खर्‍या अर्थाने ’लोहमहिला’ जयललिता यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणूनच अर्पण झाला. अर्थातच जी उंची जयललिता यांनी राजकीय क्षेत्रात गाठली होती ती खरोखर सलाम करण्याजोगी आहे. विधानसभेत विरोधकांकडून प्रचंड त्रास झाला असताना ’इथे येईल तर मुख्यमंत्री बनूनच येईल’ अशी शपथ घेतलेल्या जयललिता यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. जयललिता यांच्यातील स्थैर्य, धैर्य अफाट. देशातील एकमेव स्त्री ज्यांना अख्ख्या जनतेने ’आई’ म्हणजे अम्मा म्हटले. त्यांनी केलेले काम हे जनसामान्यांच्या हिताचे होते. त्यामुळेच त्यांच्यावर जनतेचा जीव होता. समाज एका मर्यादेनंतर तुम्ही स्त्री आहात कि पुरुष हा विचार न करता तुमच्यावर विश्वास ठेवतो. जयललिता यांचे काम असेच प्रभावी होते. एक प्रभावी स्त्री राजकारणी म्हणून जयललिता आदर्श रणरागिणीच्या रुपात अमर राहतील हे मात्र नक्की.

जयललिता हे नाव एक मोठा अध्याय आहे. मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात देखील विरोधकांवर टोमणे मारायचा चान्स मुरब्बी राजकारणी नारायण राणे यांनी सोडला नाही. अनेक जयललिता निर्माण व्हाव्या, तरच देश महासत्तेकडे जाईल असे म्हणत अम्माच्या कामाचा बोध घेऊन आपल्या सरकारने देखील काम करावं, असा चिमटा काढला. जे सांगितलं ते अम्मांनी दिले म्हणून त्यांच्यासाठी लोकं अतीव शोक व्यक्त करताहेत, असं राणे म्हणाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या दिवशी सभागृहात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र दोन्ही सभागृहात असं घडलं नाही. असो, सभागृहाच्या श्रद्धांजली वाहण्याने अथवा न वाहण्याने बाबासाहेबांचे महत्व कमी होणार नाहीच.

या भावनिक गोंधळात विधानपरिषदेचे जे नवनिर्वाचित सदस्य आहेत त्यांचा शपथविधी कॅबिनेटच्या सभागृहात पार पडला. ६ सदस्यांनी शपथ घेतली. यातले काही बिचारे राजकारणातच अतिशय नवखे असल्याने शांत चित्ताने सर्व चित्र पाहण्यात व्यस्त दिसत होते. अनेकांना हे ओळखत नव्हते तर यांच्याही ओळखीचा प्रॉब्लेम येत होता. आता उद्यापासून अधिवेशन सुरळीत चालण्याची अपेक्षा आहे.