धुळे । शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयहिंद कॉलनीतील निशा इलेक्ट्रॉनिकला रात्री 10:30 शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या वेळेस दुकान बंद करुन घरी गेल्यानंतर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजताच त्या दुकानाच्या बाजूला असलेले ई-सेवा केंद्रातील कर्मचारी बबलू महाले हा काम करत होता. त्याला अचानक दुकानातून बाहेर पडणार धुर दिसताच त्याने लगेच आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना बोलवुन घेतले.
शेजारील दुकानदारांनी कळविली घटना
ताबडतोब त्याने निशा इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक भागवत सोनगिरे यांना फोन केला. यानंतर दुकान मालकाने लागलीच येऊन दुकान उघडून पाहिले. दुकानात भीषण आग लागलेली होती. यात दुकानातील अनेक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जाळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकाने सांगितले. परिसरातील नागरिकाने ती आग विझविण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर केला. तितक्यात अग्निशामक दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमूळे अनर्थ टळला.