जया बच्चन-रवी किशन-कंगनामध्ये वाकयुद्ध

0

नवी दिल्ली: सध्या बॉलीवूड अनेक कारणांनी चर्चेत आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण त्यानंतर कंगना रानौत प्रकरणात बॉलीवूड चर्चेत आहे. कंगनाने बॉलीवूडमध्ये अनेक जण ड्रग घेत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यावरून बॉलीवूडमध्ये दोन गट पडले आहे. दरम्यान यात आता ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, अभिनेता भाजप खासदार रवी किशन यांनी उडी घेतली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाटच सोशल मीडियावर उसळली. याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे खासदार अभिनेता रवी किशन यांच्यावरही आरोप केले, ‘ज्या ताटात खातात तिथेच घाण करतात’ असे वक्तव्य केले आहे. याला खासदार रवी किशन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी स्वत:च्या हिंमतीवर भोजपुरी चित्रपटातून पुढे आलो आहे. मला कोणीही मदत केली नाही. त्यामुळे मी कोणत्याही ताटात जेवलो नाही’ असे उत्तर खासदार रवी किशन यांनी दिले आहे.

अभिनेत्री कंगना रानौतने देखील जया बच्चनवर प्रतिहल्ला केला आहे. ‘माझ्या जागेवर जर तुमची मुलगी श्वेता असती, तिला जर ड्रग दिले गेले असते त्रास दिला गेला असता तर तुम्ही काय केले असते?. तुमचा एकुलता एक मुलगा अभिषेख बच्चनला जर ड्रग देऊन आत्महत्या करायला भाग पाडले गेले असते तर तुम्ही काय केले असते?’ असा सवाल कंगनाने जया बच्चन यांना केला आहे.