’जय गणेश रुग्ण सेवा’ अभियानाचा श्रीगणेशा

0

पुणे । समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देण्याकरीता तत्पर असणार्‍या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्ण युगतरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ’जय गणेश रुग्ण सेवा’ अभियानाचा प्रारंभ झाला. शारिरीक अपंगत्व असलेल्या पुण्यासह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मोफत कृत्रिम हात-पाय व विविध आजारांवरील मोफत तपासण्यांचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला.

गणेशकला क्रीडा मंच येथे या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी दादाजे. पी. वासवानी फाउंडेशन इन लॅक्स बुधराणी हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक सुंदर वासवाणी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त उपस्थित होते. अभियानात पुण्यातील नामांकित रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे. 6 ऑगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत गरजू व गरीब रुग्णांकरीता हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अपंगांना मोफत कृत्रिम हात व कृत्रिम पाय बसवून देण्याची सुविधा कोरेगाव पार्क येथील इन लॅक्स बुधरानी हॉस्पिटलतर्फे यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. वर्षभर रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

मोफत हृदयरोग तपासणी
23 जुलै रोजी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संजीव डोळे सर्व आजारांवर रुग्णांना उपचार देणार आहेत. 30 जुलै रोजी सर्व प्रकारांच्या आजारांवर तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपचार पिंपरी-चिंचवडमधील डी. वाय. पाटील रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहेत. तसेच 6 ऑगस्ट रोजी हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुनील साठे हे मोफत हृदयरोग तपासणी आणि सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया एंजिओप्लास्टी या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
पुण्यातील नामांकित रुग्णालांचा या अभियानात सहभाग असून अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच धनकवडी येथील भारती हॉस्पिटल येथे मोफत एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून देण्याची सुविधा 5 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रस्टचे डॉ.बाळासाहेब परांजपे हे या अभियानाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून अधिक माहितीकरीता 9881418450 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.