‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष

0

भुसावळ । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व परिसरात विविध संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच शिवप्रेमी तरुणांतर्फे भगवे झेंडे लावून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, हर हर महादेव…, जय भवानी, जय शिवाजी असा जल्लोष आणि जयघोष करीत सर्वत्र शिवमय भगवे वातावरण निर्माण झाले होते.

आमदार सावकारेंच्याहस्ते पुजन
शहरातील वार्ड क्रमांक 5 मध्ये शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेते हाजी मुन्ना तेली, नगरसेवक राजेंद्र नाटकर, सागर वाघोदे, विशाल नाटकर, नितीन नाटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार सावकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी सर्व जाती, धर्माच्या जनतेला एकत्र आणून रयतेचे राज्य निर्माण केले. महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास नक्कीच देशातील समस्या सुटण्यास मदत होऊन देशात सुराज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

मोटारसायकल रॅली काढून अभिवादन
शहरातील शिवप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन नाहाटा चौफुली पासून ते सातारा पुल मार्गे सरदार वल्लभभाई पुतळा, महात्मा गांधी पुतळा यामार्गे बाजारपेठ पोलीस ठाण्याशेजारील शिवाजी महाराजांच्या नियोजित पुर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर समारोप करण्यात आला. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरेादे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मॉर्डन रोड, गांधी चौक, लक्ष्मी चौक, नृसिंह मंदिरापासून टिंबर मार्केट येथील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

श्रीनगर परिसरात कार्यक्रम उत्साहात
श्रीनगर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा.धिरज पाटील, प्रा.सीमा पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी हर्षल पाटील, कैलास पाटील, मनोज बोंडे, अमोल पाटील, जयेश लोखंडे, आशीष भोई, सचिन सूर्यवंशी, योगेश भावसार तसेच ज्येष्ठ नागरिक गणेश पाटील उपस्थित होते. कैलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल पाटील, अमोल पाटील, मनोज बोंडे, विधि देवकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

विधीवत पुजन
शिवसेनेतर्फे टिंबर मार्केट येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक व पुरोहितांकडून विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, उत्सव समिती अध्यक्ष सोनी ठाकुर, खजिनदार उमाकांत शर्मा, जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख, जगन खेराडे, मिलींद कापडे, किशोर शिंदे, निखील सोनवणे, प्रसाद ताराबळे, नामदेव बर्‍हाटे, हेमंत बर्‍हाटे, गणेश पाटील, दिपेश शर्मा, शुभम शर्मा आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच शिवसेना शहर उत्सव समितीतर्फे मिरवणूकीत सहभागी प्रत्येक मंडळाला शिवसेनेतर्फे सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यानंतर संध्याकाळी लक्ष्मी चौक येथून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात तरुणाईने जल्लोष केला. विविध मंडळांनी देखील सजीव देखावे सादर केले होते. यामुळे शोभायात्रांना मुर्त स्वरुप प्राप्त झाले होते.