जय भारत, वीर नेताजीची कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी

0

मुंबई । आकाश चव्हाण व विशाल मगर यांच्या अप्रतिम चढायामुळे जय भारत सेवा संघाने मातृभूमी क्रीडा मंडळाचा 39-26 असा पराभव केला आणि महापुरुष माघी गणेश जयंती उत्सव समिती व वरळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी चषक स्थानिक पुरुष ब गट कबड्डी स्पर्धेमधील सलामीचा सामना जिंकला. लोअर परेल-गणपतराव कदम मार्ग म्युनिसिपल शाळेच्या पटांगणात जय भारत सेवा संघ विरुद्ध मातृभूमी क्रीडा मंडळ यामधील सामना पूर्वार्धात अटीतटीमध्ये रंगला.

चढाईपटू आकाश चव्हाण व विशाल मगर यांनी जय भारत संघाला मध्यंतरास 16-15 अशी निसटती आघाडी मिळवून देत अखेर सामना 13 गुणांनी जिंकला. मातृभूमीचा प्रमुख चढाईपटू नारायण कुबलला उत्तरार्धामध्ये तोडीस तोड खेळ करता आला नाही. दुसर्‍या सामन्यात वीर नेताजी क्रीडा मंडळाने पहिल्या डावात एका लोणने पिछाडीवर राहूनदेखील साई के दिवाने क्रीडा मंडळाचे आव्हान 34-26 असे संपुष्टात आणले.वीर नेताजीला विजय मिळवून देण्याची करामत चढाईपटू सचिन सावंत, पवन चव्हाण व बचावपटू निखील महाजन यांच्या अप्रतिम खेळाने केली.