‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द !

0

बेळगाव । सीमा भागातील मराठी जनतेवर अत्याचार करणार्‍या कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपला द्वेष दाखवून दिला आहे. यामुळे ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार्‍या नगरसेवकांची पदे रद्द करण्यात येतील असा कायदा आणण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आज या राज्याचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. बेळगाव महापालिकेसह सीमा भागातील लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याने या परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गळचेपीचा कळस
सीमा भागातल्या बेळगाव महापालिकेत मराठी नगरसेवकांची संख्या सर्वाधीक आहे. हे सर्व नगरसेवक सभागृहात अनेकदा ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष करत असतात. यामुळे कन्नड राज्यकर्त्यांचे पित्त खवळत असते. यामुळे कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणार्‍या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, अशी माहिती नगरविकासमंत्री रोशन बेग यानी आज बेळगावच्या दौर्‍यावर असतांना प्रसारमाध्यमांना दिली. कर्नाटकविरोधात घोषणा व अन्य राज्यांचा जयजयकार करणार्‍या नगरसेवकांना यामुळे चाप बसेल असे ते म्हणाले.

पुढील अधिवेशनात विधेयक
विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात यासंदर्भातील दुरूस्ती विधेयक मांडले जाईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरूस्ती केली जाईल असेही ते म्हणाले. मराठी नगरसेवकानी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देवून नयेत. महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होवू नये यासाठीच कायदा दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रोशन बेग महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यावेळी नगरसेवकांना याची माहिती देणार आहेत.