भाजप नेते यशवंत सिन्हा यांची मागणी
नवी दिल्ली : पॅराडाईज पेपरप्रकरणी जर जयंत सिन्हा यांची चौकशी सुरू झाली तर त्याचवेळी जय शहाचीही चौकशी करावी. केंद्र सरकारने एका महिन्याच्या आत याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणीही माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. सिन्हा यांनी स्वपक्षावर घणाघात करण्याचे सत्र सुरूच ठेवल्याने ऐन गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
जय शहाला न्यायालयात जाण्यास सांगितले
ज्या नेत्यांची नावे पॅराडाईज पेपरमध्ये आली आहेत. त्यांची सर्वांत आधी म्हणजे एक महिन्याच्या आत चौकशी केली जावी आणि संबंधित राजकीय व्यक्ती दोषी आहे किंवा नाही यांची जनतेला माहिती द्यावी. जर जयंत सिन्हा यांची चौकशी करणार असाल तर मग जय शहाची चौकशी का केली जात नाही. त्याला तर न्यायालयात जाऊन खटला दाखल करण्यास सांगितले आहे. सर्वांचीच याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणीही यशवंत सिन्हा यांनी केली.
उगाच हवेत गप्पा मारू नका
यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपची चांगलीच कोंडी होत आहे. सिन्हा यांच्याकडून घरचा आहेर मिळत असल्याने भाजप नेत्यांची आवस्था अवघड झाल्याचे दिसत आहे. सिनहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नोटाबंदी ही जल्लोष करण्यासारखी बाब नसल्याचे म्हटले. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतरच देशात किती काळा पैसा आहे, हे समजेल. उगाच हवेत गप्पा मारून काहीही उपयोग नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.