कोलकाता । ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाला विरोधी करणारी व्यक्ती इतिहासजमा होईल, असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले. त्यांच्या या विधानाने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तो काळ भाजपसाठी सुवर्णकाळ ठरेल, असे सांगितले होते. त्यानंतर आता घोष यांनी हे विधान केले. ते म्हणाले,
देशभरातील लोक गुजरातपासून गुवाहाटी आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ असा जयघोष करतील. जो कोणी त्याला विरोध करेल तो इतिहास जमा होईल, अशाप्रकारची धमकीच त्यांनी यावेळी दिली. उत्तर 24 परगना जिल्ह्यात झालेल्या एका जाहीरसभेत घोष यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. या सभेत बोलताना, राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यासोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती चालणार नाही. तुमच्या वाईट सवयी बदला, असे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुनावले. देशभरात भाजपचे 11 कोटी सदस्य आहेत. तृणमूल काँग्रेसमधील आपल्या बंधूंना विनंती करतो की, त्यांनी आपल्या वाईट सवयी बदलाव्यात, अन्यथा मी त्यांना पूर्ण बदलून टाकेन, अशी धमकीच घोष यांनी यावेळी दिली.
घोष यांच्या या धमकीनंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. घोष यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. भाजप नेत्याच्या तोंडी अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही, असे तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या लालसेपोटी ते असे वक्तव्य करत आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे नेते ज्या पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षात असे लोक आहेत, याचे दुखः वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. धर्माच्या नावावर लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणार्या भाजपचे स्वप्न देशातील जनताच पूर्ण होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपकडे 11 कोटी सदस्य असले तरी, त्यांच्या या योजनेला सव्वाशे कोटी जनता यशस्वी होऊ देणार नाही. ते धर्माच्या नावाने लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही बंगालची संस्कृती नाही. येथील जनतेचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच समर्थन आहे, असेही त्यांनी सांगितले.