पुणे : ‘जय श्रीराम’, ‘राजे’ असे समोरच्या काचेवर लिहिलेल्या गाडीतून श्रीगोंद्याहून पुण्यात गोमांस वाहतूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी हडपसर येथे उघडकीस आला. जागरूक गोरक्षकांनी ही गाडी आडवून त्यातील गाईचे मुंडके आणि मांस असे 700 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायी कापनारा आबिद कुरेशी, चालक अतुल तुतारे यांच्यासह गोमांस विकत घेणार्यावर हडपसर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
जागृत गोरक्षकांनी अडविली गाडी
श्रीगोंदा येथील एका गाडीतून पुण्यात गोमांस आणले जात आहे, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हडपसर येथे सकाळी सातच्या सुमारास संशयास्पद कॉलीस गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालक पळून जात असल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून ही गाडी अडवली. याची माहिती त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांच्या समक्ष या गाडीची तपासणी केली असता, त्यात 6 गायींचे सुमारे 700 किलो गोमांस आढळले. धक्कादायक म्हणजे, गोमांस वाहतूक करताना त्यावर संशय येऊ नये म्हणून जय श्रीराम, राजे असे लिहिलेली गाडी मुद्दाम वापरण्यात आली, असे शिवशंकर स्वामी यांनी सांगितले.