जय हिंद, जय भारत, जय इस्त्रायल!

0

बेंजामिन नेतन्याहूंकडून भारत-इस्त्रायल मैत्रीचा नवा नारा

अहमदाबाद : जय हिंद, जय भारत, जय इस्त्रायल! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद. अशा शब्दांत बुधवारी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारत-इस्त्रायल मैत्रीचा नवा नारा दिला. द्विपक्षीय संबंध वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चेसाठी त्याच बरोबर भारतातील आपल्या जंगी स्वागतासाठी त्यांनी मोदी यांचे आभारही मानले. त्यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमालाही भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर त्यांनी चरखादेखील चालविला. गांधीजी हे मानवतेचे महान प्रेषित होते, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना महात्मा गांधींप्रती व्यक्त केल्यात. साबरमती किनारी नेतन्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह पतंग उडविण्याचा आनंदही लुटला. वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जोरदार पतंगबाजी केली. भारत व इस्त्रायलच्या या मैत्रीपर्वाने पाकिस्तानला मात्र जोरदार पोटदुखी सुरु झाली असून, हे दोन देश इस्लाम व मुस्लिमांचे शत्रू आहेत, अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.

दोघेही विचारांनी तरुण, भविष्याबाबत आशावादी!
अहमदाबाद जिल्ह्यातील डिओ धोलेरा गावात उभारण्यात आलेल्या आय क्रिएट सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याहस्ते झाले. यावेळी नेतन्याहू यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, हायफाच्या स्वातंत्र्यावेळी अऩेक भारतीय सैनिकांनी आपला जीव गमाविला. यामध्ये गुजराती सैनिकांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे गुजरातचेही खूप खूप धन्यवाद. पंतप्रधान मोदी आणि मी आम्ही दोघे विचारांनी तरुण आणि भविष्याबाबत आशावादी आहोत. जगाला आयपॅड, आयपॉडची माहिती आहे. त्यानंतर आता आय क्रिएटची माहिती असायला हवी, असेही नेतन्याहू म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी जेव्हा गेल्यावर्षी इस्त्रायलला गेलो होतो, तेव्हा आय क्रिएट फाउंडेशनद्वारे भारत आणि इस्त्रायलमध्ये मजबूत संबंध निर्माण व्हावेत, अशी माझी इच्छा होती. तेव्हापासून माझे मित्र बेंजामिन कधी भारतात येतील याची वाट पाहात होतो. आज तो दिवस आला असून, आम्ही दोघे मिळून या फाउंडेशनचे उद्घाटन करत आहोत. शेतकरी जेव्हा एखादे रोपटे लावतो त्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीला त्याची फळे मिळतात, असे उद्गारही मोदींनी यावेळी काढले.

पाक परराष्ट्र मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे!
बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौर्‍याने पाकिस्तानला जोरदार पोटदुखी सुरु झाली आहे. या मैत्रीला पाकने पॅलेस्टाईन व काश्मीरशी जोडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही देशांनी मुस्लिमांची भूमी बळकावल्याचा आरोप करत पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे दोन्ही देश केवळ मुस्लीमांचे शत्रू म्हणून एकत्र आलेत, अशी वल्गना केली. जीओ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, की इस्त्रायल व भारत एकत्र येणे सहाजिक आहे. कारण, या दोन्ही राष्ट्रांचे इस्लाम व मुस्लिमांशी शत्रूत्वाचे एकच नाते आहे. भारताने काश्मीरच्या भूमीवर ताबा मिळविला तर त्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीवर ताबा मिळविला आहे, अशी मुक्ताफळेही ख्वाजा आसिफ यांनी उधळली.