जर्मनीचा भारताला पाठिंबा

0

नवी दिल्ली । परमाणू पुरवठादार गटात (एनएसजी) भारताला सदस्यत्व मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. या गटात भारताच्या समावेश करण्याला चीनने अनेक अडथळे निर्माण केलेले असतानाही अनेक देशांनी भारताचे समर्थन केले आहे. या देशांच्या यादीत आता जर्मनीचाही समावेश झाला आहे. जर्मनीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याने सांगितले की एनएसजी गटात भारताला स्थान देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात जर्मनीने भारताला पाठिंबा दिला आहे. जगातील 48 देशांचा समावेश असलेल्या या गटात जागा मिळवण्यासाठी भारताने हरऐक प्रयत्न केले आहेत. भारताच्या या प्रयत्नांमध्ये चीनने अडथळा आणला आहे. एनटीपी करारावर सह्या केल्याशिवाय भारताला सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी चीनने केली आहे. पण राजनैतिक प्रयत्नांमुळे या गटात जागा मिळवण्यासंदर्भात भारताच्या आशा कायम राहिल्या आहेत. गत आठवड्यात अमेरिकेनेही भारताला पाठिंबा जाहिर केले होते. यासंदर्भात जर्मनीच्या परराष्ट्र सचिव मार्कस एडरर यांनी भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आगामी जर्मनी भेट, दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत आणि मे महिन्यात बर्लिनमध्ये होणार्‍या उभय देशांच्या राजनैतिक कमिशनबाबत चर्चा झाली.

मोदींची जर्मन भेट
आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा जर्मनीला भेट देतील. मोदी मे महिन्यात पहिल्यांदा जर्मनीचा दौरा करणार आहेत. त्यानंतर जी 20 परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी जुलै महिन्यात पुन्हा जर्मनीला रवाना होतील. या परिषदेत जगभरातील 20 देश सहभागी होणार असून भारतासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे तसेच या परिषदेत पंतप्रधान मोदी नेमकी काय भूमिका मांडणार आहेत हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताला पहिल्यांदाच महत्त्व
जर्मनीने पहिल्यांदाच भारतीय उपखंडात परराष्ट्रीय धोरण मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यात राजकीय आणि आर्थिक संबंध सुधारण्याकडे जर्मनीचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने देशात राबवलेल्या अक्षय योजना, स्मार्ट सिटी संकल्पना, गंगा स्वच्छता मोहीम, दुहेरी शिक्शण पद्धती आणि रेल्वेमधील सुधारणा या गोष्टींमुळे जर्मनीचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जर्मनीशी संबंध सुधारल्याचा फायदा भारताला एनएसजीमध्ये मिळू शकतो.