जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला बनवण्याचा विक्रम जर्मनीत नोंदला गेला असून, भारतीय वाळूशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांचा विक्रम त्यामुळे मोडीत निघाला आहे. या किल्ल्याची उंची 16.68 मीटर असून तो पूर्ण होण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागला. त्यासाठी अनेक कलावंत काम करत होते. अथेन्सचा किल्ला आणि पिसाचा झुकता मनोरा अशा अनेक स्थळांसोबत जगातील पर्यटकांना आकर्षित करणार्या अनेक स्मारकांनी या किल्ल्याला सजवण्यात आले आहे.
या किल्ल्यासाठी सुमारे 3,500 टन वाळूचा वापर करण्यात आला आहे. ही वाळू 168 ट्रकमध्ये भरून एक आठवडाभर आणण्यात येत होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. या संस्थेचे निर्णायक जॅक ब्रोकबँक यांनी मोठ्या जनसमुदायासमोर या विक्रमाची पडताळणी केली. त्यासाठी त्यांनी लेसर टेक्नॉलॉजीचा वापर करून या कलाकृतीचे माप घेतले व नवीन विक्रमाची नोंद केली. पटनायकांनी यावर्षी 10 फ्रेब्रुवारी रोजी ओडिशातील पुरी येथे बीचवर 14.84 मीटर लांब वाळूचा किल्ला बनवून विश्वशांतीचा संदेश दिला होता.