जर्मनीमध्ये येत्या 24 सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यात सध्याच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल या चौथ्यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात यंदा प्रथमच एक नवल जर्मन नागरिकांना पाहायला मिळते आहे. मर्केल यांच्या निवडणूक प्रचार पोस्टर्समध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांची मर्केल यांना समर्थन द्या असे सांगणारी पोस्टर झळकली आहेत. बर्लिनमधील रस्ते, चौक, पार्क व स्टेशन्स अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी लागलेली ही पोस्टर कुतूहलाचा विषय बनली आहेत.
अमेरिकेतील निवडणुकातही डेमोक्रॅटिकच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारासाठीही त्यांना समर्थन द्या, असे सांगणारी ओबामा यांची पोस्टर लावली गेली होती. मर्कल यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये काळा, लाल व गोल्ड कलरचा वापर केला गेला आहे तसेच या पोस्टर्सवर मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचा लोगोही आहे. या पोस्टरमागे असा संदर्भ आहे की, जेव्हा ओबामा जर्मनी भेटीवर आले होते तेव्हा एका भाषणात यांनी मी जर जर्मन मतदार असतो, तर मर्केल यांनाच मत दिले असते, असा उल्लेख केला होता. ओबामा यांच्या अपिलाचा फायदा मर्केल यांना मिळावा यासाठी ही पोस्टर्स लावली गेली आहेत. अर्थात निवडणूक तज्ज्ञांच्या मतानुसार मर्केल यांना निवडणूक जिंकण्यासाठी ओबामा यांच्या असल्या मदतीची अजिबात आवश्यकता नाही. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे ओबामा पोस्टर्ससंबंधी त्यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेने मर्केल यांचा सल्ला घेतलेला नव्हता तसेच ओबामा फाउंडेशनलाही यासंदर्भात काहीही माहिती दिली गेलेली नाही असे समजते, तरीही ओबामा यांच्या पोस्टर्सना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.