जर्मनीत मोदी-जिनपिंग भेट

0

हेम्बर्ग : जी-20 राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी हेम्बर्ग येथे हजेरी लावली. ब्रिक्स देशांच्या संयुक्त बैठकीत हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोघांची अनऑफिशीअल चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले आहे. दहशतवादाविरोधात लढण्याचे भारताचे मनोध्येर्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार यावेळी जिनपिंग यांनी काढलेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. तर मोदींनी ब्रिक्स राष्ट्राच्या चळवळीला जिनपिंग यांच्यामुळेच दिशा मिळू शकली, असे कौतुकोद्गार काढले. या दोन्ही नेत्यांचे जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांनी स्वागत केले. इस्त्राईलच्या तीन दिवशीय दौर्‍यानंतर मोदींनी ब्रिक्स बैठकीसाठी हेम्बर्ग गाठले होते. भारत-चीन सीमेवर सिक्कीम भागात दोन्ही देशांदरम्यान प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर मोदी-जिनपिंग यांची भेट होणार नाही, असे कालच चीनने जाहीर केले होते. त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

सिक्कीम सीमावादावर मात्र चर्चा नाही!
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जर्मनीत मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार नसल्याचे कालच सांगितले होते. सद्या परिस्थिती ठीक नसून, हेम्बर्ग येथील जी-20 बैठकीत हे दोन्ही नेते भेटणार नाहीत, असे या मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते. तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही पंतप्रधानांच्या वेळापत्रकात काहीही बदल केला गेलेला नसून, हेम्बर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 जुलैदरम्यान हजर राहतील, असे सांगितले होते. पंतप्रधानांच्या भेटीगाठी पूर्वनिश्चित असल्याने जिनपिंग यांच्या भेटीचा प्रश्नच नसल्याचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी स्पष्ट केले होते. परंतु, मोदी व जिनपिंग यांच्या भेटीने दोन्ही देशाचे प्रवक्ते अक्षरशः तोंडघशी पडले आहेत. सिक्कीम सीमावादाबाबत या नेत्यांत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहितीही सूत्राने दिली. गेल्या 19 दिवसांपासून चीन व भारताचे लष्कर एकमेकांसमोर उभे ठाकलेले असून, डोकालम भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मोदी-जिनपिंग यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालेले आहे.

ब्रिक्स संमेलनाचे रितसर निमंत्रण
येत्या सप्टेंबरमध्ये ब्रिक्स सदस्य देशांचे चीनमध्ये संमेलन होत आहे. त्यासाठी चीनकडून सदस्य राष्ट्रांना रितसर निमंत्रणही यावेळी देण्यात आले. त्यामुळे सिक्किमच्या वादातून युद्धाची धमकी देणारा हाच चीन देश आहे का, अशीही शंका अनेकांना आल्यावाचून राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावेळी भारतात नव्याने लागू झालेल्या जीएसटी या एक देश एक प्रणालीचा दाखला देत, आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्थिक सुधारणांमध्ये एकसूत्रीपणा आणण्याची गरज व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि रशियाचे पंतप्रधान व्लामिदिर पुतिन यांनीही यावेळी आवर्जून हस्तांदोलन केल्याचे बघायला मिळाले. दोन दिवस ही जी-20ची परिषद चालणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विकासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली.