जर्मनीत म्युनिक स्टेशनवर गोळीबार

0

म्युनिक । जगात सध्या वेगळ्याच दहशतवादी हल्ल्यांचे प्रकार घडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक किंवा खेळाच्या स्टेडियममध्ये घुसून बेधुंद गोळीबार करणे किंवा थेट लोकांवरच ट्रक घालणे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. असाच आणखी एक प्रयत्न जर्मनीतल्या म्युनिक स्टेशनवर घडला आहे. या स्टेशनव एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार या हल्लेखोराला पोलिसांनी अटकही केली आहे.

म्युनिक स्टेशनवर अचानक गोळीबार झाल्याने तिथे एकच गोंधळ उडाला होता. तसेच प्रवासी घाबरलेही होते. मात्र या अज्ञात हल्लेखोराला जेरबंद केल्यानंतर तिथली परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच चार पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

पोलीस अधिकार्‍याच्या पिस्तुलीने केला गोळीबार
या हल्लेखोराने हा हल्ला का केला हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र यामागे कोणतेही धार्मिक किंवा राजकीय कारण नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी झालेल्या एका महिला पोलीस अधिकार्‍याची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रोज होणारी तपासणी सुरू असताना हा हल्ला झाला आहे, असे म्युनिक पोलिसांनी म्हटले आहे. तर हल्लेखोराने महिला पोलीस अधिकार्‍याचे पिस्तुल हिसकावले आणि तिच्यावर गोळी झाडली, तसेच अंदाधुंद गोळीबार सुरू केला, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराची चौकशी करण्यात येते आहे.

लंडन ब्रिज हल्ला
लंडन ब्रिजवर चालणार्‍या पादचार्‍यांवर एका व्यक्तीने मोटार व्हॅन चढवली होती. याशिवाय अन्य दोन ठिकाणीही हल्ले करण्यात आले होते. पोलिसांनी हे हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचे जाहीर केले होते. लंडन ब्रिजच्या जोडीने बॅरो मार्केट, वॉक्सहॉल विभागात हल्ले झाले होते. या हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता तर 48 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यांनंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये सुसाईड जॅकेट घातलेल्या आठ अतिरेक्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. तर 12 संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले होते.

मँचेस्टर हल्ला
22 मे रोजी रात्री 10.35 च्या सुमारास मँचेस्टर एरिनामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात लहान मुलांचाही समावेश होता. अमेरिकेची पॉप गायिका अरियाना ग्रँड हिचा कार्यक्रम त्यावेळी नुकताच संपला होता. या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने घेतली होती. जुलै 2007 नंतर लंडनमध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. मँचेस्टर एरिना हे युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम आहे. 1995 मध्ये उभारण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये संगीताचे मोठे कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा होत असतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील काही खेळांचे सामने या स्टेडियममध्ये झाले आहेत.