मुंबई । भारतीय क्रिकेट विश्वामध्ये जर्सी नंबर 10 आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण अगदी पक्के आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील करिअर हे 24 वर्षांचे आहे. 10 मार्च 2012 रोजी पाकिस्तान विरूद्ध सामना खेळताना सचिनने 10 नंबरची जर्सी शेवटची घातली होती. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी 10 नंबरची जर्सी घालणे कटाक्षाने टाळले होते. हा खेळाडूंनी पाळलेला अलिखित नियम होता. 2017 मध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण करताना 10 नंबरची जर्सी घातली होती. तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी टीका केली होती. शार्दुलने न्युमरोलॉजीच्या गणितानुसार 10 नंबर निवडला होता.
बीसीसीआयचा निर्णय
क्रिकेट आणि सचिनच्या चाहत्यांना 10 नंबर हा केवळ सचिनशी निगडीत रहावा असे वाटते आहे. बीसीसीआयदेखील या प्रकारणी वाद टाळावा या भूमिकेत आहेत. परिणामी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 नंबर खेळाडूंना निवडता येणार नाही . अशी भूमिका घेण्याच्या विचारात असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका पदाधिकार्याने मुलाखतीमध्ये दिली आहे.