शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांची मागणी
पिंपरी : प्राधिकरणातील जलतरण तलावाची अवस्था देखभाल व दुरुस्तीअभावी उकिरड्याप्रमाणे झाली आहे. या तलावाच्या दुर्दशेमुळे तलावाचा लाभ घेणार्या जलतरणपटूंच्या सुरक्षिततेची गंभीर समस्या उभी राहिली आहे. तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हातात घेऊन महापालिकेने जलतरणपटूंच्या डोक्यावरील असुरक्षिततेची टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनी महापालिकेकडे केली आहे.
तुटक्या फरश्या, रेलिंग
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, प्राधिकरणातील जलतरणपटूंना सरावासाठी महापालिकेने सन 2000 मध्ये प्राधिकरण सेक्टर 22 येथे जलतरण तलावाची उभारणी केली. प्राधिकरणात हा एकमेव जलतरण तलाव असून सध्या तो प्रशासकीय गलथानपणाची शिकार बनला आहे. तलावात फुटक्या फरशा, तुटके रेलिंग, प्रशिक्षित कर्मचार्यांचा अभाव, जलतरण प्रशिक्षकाची उणीव आणि सफाई कर्मचार्यांची कमतरता, यामुळे सध्या जलतरणास येणार्या तरुणांची डोकेदुखी बनला आहे.
क्रीडा विभागाचे दुर्लक्ष
मोडकळीला आलेल्या व्यवस्थेमुळे जलतरणपटूंवर रोज जखमी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या दुरवस्थेमुळे पालकांनी आपल्या मुलांना पोहण्यासाठी पाठविणे बंद केले आहे. पुढील महिन्यात उन्हाळा सुरु होत आहे. उन्हाळी सुट्टीत या तलवावर पोहण्यासाठी जलतरणपटूंची मोठी गर्दी होत असते. यातून महापालिकेला मोठा महसूल देखील मिळतो. परंतु, तलावाच्या दुरुस्तीकडे क्रीडा विभाग दुर्लक्ष करत आहेत.
कर्मचारी वर्ग नियुक्त करावा
या तलावाची त्वरित दुरस्ती करण्यात यावी. तलावातील पाण्याची पातळी नियंत्रित करणारी यंत्रणा नवीन बसविणे, तलावामधील स्वयंचलित गाळ काढणा-या पंपाची दुरुस्ती करून कार्यप्रवण करणे, प्रेशर फिल्टर्सची तांत्रिक देखभाल दुरुस्ती करणे, पाणी र्निजतुक करणारी व्यवस्था कार्यक्षम करणे, तलाव परिसरातील स्वच्छतागृहे, स्नानगृहे, शॉवर, दरवाजे यांची देखभाल करणे आणि आवश्यक तो कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेवक गावडे यांनी निवेदनातून केली आहे.